महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याची तयारी जोरदार सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे अयोध्येतील रामजन्मभूमीला भेट देणार आहेत. यानिमित्ताने शिवसेनेकडून एक खास टीझर रिलीज करण्यात आला आहे. , ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’ या टीझरमध्ये महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा या प्रमुख मुद्यांवर भर देण्यात आला आहे. हा टिझर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रात शिवधनुष्य यात्रेला सुरुवात करणार आहेत.
शिवसेनेने जारी केलेल्या या टीझरमध्ये महाराष्ट्रात सुशासन असावे आणि रामराज्य हे सत्ताधारी नसून सेवकाचे असावे, असे म्हटले आहे. लोकांनी एक कुटुंब असले पाहिजे आणि मानवतेची सेवा ही सर्वात महत्वाची गोष्ट असली पाहिजे. जिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठेल आणि भगवा कधीच उतरणार नाही. या टीझरमध्ये प्रत्येक कणात कणात राम असे लिहिले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल.
भगव्याला कधीही डावललं जाणार नाही, रग रग में राम, कण कण में राम… या ओळींचा कलात्मक वापर या टीझरमध्ये करण्यात आल आहे. हिंदी भाषेत असलेल्या या टिझर मध्ये महाराष्ट्रात रामराज्याची वातावरण निर्मिती करण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ या ओळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री शिंदे पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. या विषयाकडे राजकारण म्हणून पाहणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३० नेत्यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी
केरळ गाडी जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीत घातल्या बेड्या
१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!
सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…
अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते आणि पंतप्रधान मोदी ते पूर्ण करत आहेत. यामध्ये मंदिरासाठी सागवानाचे लाकूड आम्ही आमच्या बाजूने थोड्याफार प्रमाणात मदतीसाठी पाठवले आहे. धरमवीर आनंद दिघे यांनी चांदीची वीट पाठवली होती. त्यामुळेच अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते.







