देशभरात होळीचा आणि रंगपंचमीचा सण साजरा केला जात असताना राजकीय नेत्यांकडूनही जनतेला शुभेच्छा दिल्या जात असून रंगपंचमी साजरी केली जात आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी करताना सत्ताधारी पक्षांसह विरोधकांना होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना टोलाही लगावला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. शुभेच्छा देताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. त्यांचा दृष्टिकोन हा महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य बनवण्याचं आहे. त्यामुळे, सर्वच पक्षांनी, धर्मांनी, आम्ही सर्वांनी आणि महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेनं या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पाठींबा द्यावा.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. “संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता जो शिमगा साजरा करतात तो बंद करुन त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी सुचना कराव्यात. वर्षभर शिमगा साजरा करता. आज होळीच्या दिवशी तो शिमगा न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांनी आम्हा सगळ्यांना विकासाकरिता सूचना द्याव्यात. राऊतांनी रोज सकाळी बोलावं पण, महाराष्ट्राच्या हिताकरिता बोलावं,” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी टीका त्यांनी केली.
हे ही वाचा :
पंजाब: शिवसेना जिल्हाध्यक्षाची गोळीबारात हत्या, एक अल्पवयीन मुलगाही जखमी!
१९ मार्चपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नाहीच
देशभरात होळीचा उत्साह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा!
पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
अजित पवारांना शुभेच्छा देताना बावनकुळे म्हणाले की, “अजित पवारांना शुभेच्छा देतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरिता या वेळेस जसा अर्थसंकल्प सादर केला, तसाच पुढच्या वेळीही करावा.” तर, एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रच राहून महाराष्ट्राचा विकास करावा.