पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांना वेचून गोळ्या घालण्यात आल्या होत्या मात्र हे नेमके कधी आणि कसे सुरू झाले याची कहाणी ऋषी भट्ट या प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने सांगितली आहे.
ऋषी भट्ट, ज्यांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ते त्या वेळी झिपलाइन (आकाशातून जाणारा रोप वे सारखा झोपाळा) करत होते. व्हिडिओमध्ये ते हसताना आणि स्वतःचा व्हिडिओ शूट करताना दिसतात, तर पार्श्वभूमीवर गोळ्यांचे आवाज ऐकू येतात. इंडिया टुडेशी बोलताना, भट्ट यांनी सांगितले की झिपलाइन ऑपरेटरने “अल्लाहू अकबर” अशा घोषणा दिल्या आणि लगेच गोळीबार सुरू झाला.
“आम्ही काश्मीर आणि पहलगामला प्रवास करत होतो, असे सांगत भट्ट यांनी नमूद केले की, त्यांनी झिपलाइन चालू करण्याआधी त्यांची पत्नी, मुलगा आणि आणखी चार लोक आधीच समोरच्या बाजूला गेले होते. “ते तिकडे असताना त्या व्यक्तीने ‘अल्लाहू अकबर’ म्हटले नाही. पण मी झिपलाइनवर असताना त्याने तीनदा ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा दिली आणि मग गोळीबार सुरू झाला.”
हे ही वाचा:
पाकला दरदरून घाम; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ होऊ लागले रिकामे
“पाकिस्तानसोबत चर्चा नकोच! कारवाई करा…” पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?
पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट, ‘भारताचा लष्करी हल्ला अपरिहार्य’
“वडेट्टीवारांच्या विधानाला मूर्खपणा म्हणावं की…” देवेंद्र फडणवीस संतापले
१५-२० सेकंदांत भट्ट यांना गोळीबार सुरू झाल्याची जाणीव झाली. “माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती खाली पडतो,” त्यांनी सांगितले. “त्या क्षणी मला कळले की काहीतरी चुकीचे घडतेय. मी माझी झिपलाइनची दोरी थांबवली, सुमारे १५ फूट उंचीवरून खाली उडी मारली आणि माझी पत्नी व मुलासोबत पळायला सुरुवात केली. माझ्या डोक्यात फक्त माझे व माझ्या कुटुंबाचे प्राण वाचवायचे हेच विचार होते.”
ते सांगतात की, ते जंगलात धावत गेले आणि मग पार्किंग एरियाकडे वळले, नंतर सुरक्षिततेसाठी श्रीनगरकडे गेले.
“मी माझा झिपलाइन राइड एन्जॉय करत होतो,” भट्ट म्हणाले. “माझी पत्नी ओरडत होती, ‘कृपया खाली या, कृपया खाली या.’ मी खाली पाहिले तेव्हा मला काहीतरी चुकते आहे हे जाणवले. मी उडी मारली आणि बाहेर आलो.”
पलायनानंतर पत्नीशी बोलताना त्यांनी सांगितले, “माझ्या पत्नीच्या बाजूलाच दोन जोडपी होती. दहशतवादी आला, त्यांचे नाव व धर्म विचारले आणि मग त्यांच्यावर गोळीबार केला. फक्त मी झिपलाइनवर होतो म्हणून माझा जीव वाचला. जर मी पत्नीसमवेत जमिनीवर असतो, तर काय झाले असते, कल्पनाही करू शकत नाही.”
दहशतवाद्यांच्या कृत्यांचे वर्णन करताना भट्ट म्हणाले, “(दहशतवादी) पर्यटकांना कलमा म्हणायला लावत होते. जे म्हणू शकले नाहीत, त्यांची नावे व धर्म विचारले आणि मग त्यांच्यावर गोळीबार केला.”
ते म्हणाले, “मी माझ्यासमोर १६ ते १८ हत्या होताना पाहिल्या.” भट्ट यांनी सांगितले की ते सुमारे १५–२० मिनिटे झुडपात लपून होते, गोळीबार थांबण्याची वाट पाहत होते. “मी तेथे शांतपणे झोपलो होतो, गोळीबार थांबत नाही तोपर्यंत. थांबल्यानंतर मी जंगलातून पळालो.”
जेव्हा विचारले की दहशतवादी फौजी गणवेशात होते का, भट्ट म्हणाले, “दहशतवादी सुरक्षा रक्षकांसारखे कपडे घालून होते. मी पळताना दोन सुरक्षा रक्षक मृत पडलेले पाहिले, आणि ते निर्वस्त्र होते. त्यामुळे मी गृहित धरतो की दहशतवाद्यांनी त्यांचे गणवेश चोरले.”
ते पुढे म्हणाले की, गोळीबार सुरू झाल्यावर तेथे एकही स्थानिक रहिवासी नव्हता. “स्थानिक लोक सर्वात आधी पळून गेले. मदतीला कोणीही नव्हते. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी जंगलातून पळून गेल्यानंतर १८ मिनिटांत लष्कर आले आणि आम्हाला सुरक्षित केले.”
२२ एप्रिलचा पहलगाम हल्ला हा या भागातील अलीकडील वर्षांतील सर्वात भीषण हल्ला ठरला, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या गटाने, “द रेसिस्टन्स फ्रंट”ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर उपाय केले, ज्यात सिंधू जल करार निलंबित करणे, पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी, अटारी-वाघा सीमेचे बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या कालमर्यादेत भारत सोडण्याचे आदेश यांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे जगभरातील भारतीय समुदायांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि पाकिस्तानवर जोरदार टीका झाली.