झिम्बाब्वेचा एकेकाळचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीक याचे रविवारी निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असलेला हिथ स्ट्रीक उपचार घेत होता. त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. हिथ स्ट्रीकची पत्नी नादिन स्ट्रीकने फेसबुकवर पोस्ट टाकून हिथच्या निधनाची बातमी कळवली.
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविवारी ३ सप्टेंबरला पहाटे हिथ स्ट्रीकचे निधन झाले. माझ्या जीवनातील अत्यंत प्रेमळ व्यक्ती आणि माझ्या मुलांचा पिता हिथला देवदूतांनी नेले. ज्या घरात तो आपल्या कुटुंबिय आणि आप्तेष्टांसमवेत राहात होता. आम्ही सगळे त्याच्यासोबत कायम आहोत.
काही दिवसांपूर्वी हिथ स्ट्रीकचे निधन झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या पण त्यानंतर त्या अफवा असल्याचे समोर आले. त्यावेळी ऍडम गिलख्रिस्ट आणि अनिल कुंबळे या क्रिकेटपटूंनीही ट्विट करत स्ट्रीकला आदरांजली अर्पण केली होती. पण नंतर झिम्बाब्वेचा माजी खेळाडू हेन्री ओलोंगा याने ही बातमी खरी नसल्याचे म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेतील प्रख्यात डॉक्टरांकडून हिथवर उपचार सुरू होते.
हे ही वाचा:
एक देश एक निवडणूक; समितीमधील सहभागास अधीर रंजन चौधरी यांचा नकार !
जेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला
बालासोर रेल्वे अपघातासाठी ३ रेल्वे अधिकारी जबाबदार
आमदार नरेंद्र मेहताच्या मुलाच्या मोटारीचा सी लिंकवर भीषण अपघात
झिम्बाब्वे संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हिथ स्ट्रीकने आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला होता. त्याने ६५ कसोटीत झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले होते तर १८९ वनडे सामनेही तो खेळला होता. आपल्या या कारकीर्दीत त्याने ४५५ बळी घेतले होते. त्यात २३ वेळा चार बळी घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर होता. पाचवेळा त्याने ८ बळी घेण्याची कामगिरीही केली होती.
त्याने फलंदाजीतही छाप पाडली होती. कसोटी क्रिकेटमध्ये १९९० धावा त्याने केल्या तर वनडेत त्याच्या खात्यात २९४३ धावा होत्या. स्ट्रीकने १९९३मध्ये पदार्पण केले होते. २००५पर्यंत तो झिम्बाब्वेसाठी खेळला. भारताविरुद्ध हरारे येथील २००५मध्ये खेळलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना होता. हॅम्पशायर आणि वॉर्विकशायर यांच्यासाठीही तो खेळला होता.