आता झिम्बाब्वेनेही पाकिस्तानला हरवले; अवघ्या एका धावेने पाकिस्तानचा पराभव

टी-२० वर्ल्डकपमधील आव्हानाला धोका

आता झिम्बाब्वेनेही पाकिस्तानला हरवले; अवघ्या एका धावेने पाकिस्तानचा पराभव

भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या पाकिस्तानला टी-२० वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात चक्क झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. अवघ्या एका धावेने झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले. या पराभवामुळे पाकिस्तानच्या टी-२० वर्ल्डकपमधील आव्हानाला तडा जाण्याची शक्यता आहे. सुपर १२ मधील दोन सामने पाकिस्तानने गमावले आहेत. पाकिस्तानचा संघ आता पाचव्या क्रमांकावर असून सहा जणांच्या दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांच्या खात्यात एकही गुण नाही. भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश हे वरच्या चार क्रमांकात आहेत.

पर्थ येथील या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३० धावा केल्या होत्या. त्यामुळे ही धावसंख्या पाकिस्तानसाठी सहज सोपी असल्याचा अंदाज होता. पण एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्यानंतर पाकिस्तानची स्थिती डळमळीत झाली आमि अखेरच्या षटकांत ११ धावांची गरज असताना त्यांना पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली.

अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावा हव्या असताना पाकिस्तानच्या शाहीन शहा आफ्रिदी याला धावचीत करण्यात झिम्बाब्वेला यश आले. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी आपल्या खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या

‘हिजाब’ प्रकरणात शैक्षणिक संस्थेचे नियम सर्वोच्च

अकासा एअरचे विमान १९०० फूट उंचीवर पक्ष्याला धडकले

एकाच वेळी एकाच हाताने ‘तिने’ काढली १५ महापुरुषांची चित्रं, आनंद महिंद्रांनी केले कौतुक

 

अखेरच्या षटकात ११ धावा हव्या असताना नवाझने पहिल्या चेंडूवर ३ धावा घेतल्या आणि नंतर मोहम्मद वासिमने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पुढच्या चेंडूवर वासिमने एक धाव काढल्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात पहिल्या तीन चेंडूंमध्ये ८ धावा जमा झाल्या. पण त्यानंतरचा चौथा चेंडू मात्र निर्धाव गेला. नवाझला धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर मोहम्मद नवाझ झेलचीत झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. अखेरच्या चेंडूवर ३ धावा करण्याचे आव्हान पाकपुढे होते.

झिम्बाब्वेच्या ८ बाद १३० धावसंख्येला उत्तर देताना पाकिस्तानचा संघ ८ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. झिम्बाब्वेच्या सिन विल्यम्सने ३१ धावांची सर्वोच्च खेळी केली तर पाकिस्तानच्या मोहम्मद वासिमने ४ बळी घेतले शादाब खानने ३ फलंदाज टिपले. पण झिम्बाब्वेची ही छोटी धावसंख्याही पाकिस्तानला महागात पडली. शान मसूदची ४४ धावांची खेळी, मोहम्मद नवाझच्या २२ धावा याव्यतिरिक्त पाकिस्तानला हे आव्हान झेपलेच नाही.

Exit mobile version