आयसीसी विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या साखळी फेरीत वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही मुख्य फेरीत पोहचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. झिम्बाब्वेने वेस्ट इंडीजवर विजय मिळवून वेस्ट इंडीजचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले होते. त्यानंतर मंगळवारी सुपर सिक्स लढतीत स्कॉटलंडकडून झिम्बाब्वेला पराभवाचा धक्का बसला.
स्कॉटलंडला मिळालेल्या या विजयामुळे त्यांना मुख्य फेरीत पोहोचण्याची अधिक संधी असणार आहे. सुपर सिक्समधील स्कॉटलंडची अखेरची लढत नेदरलँडविरुद्ध होणार आहे. या लढतीत मोठा पराभव टाळल्यास स्कॉटलंडला मुख्य फेरीत वाटचाल करता येणार आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेला २३५ धावांचे आव्हान दिले होते. चुरशीच्या या लढतीत झिम्बाब्वेचा डाव २०३ धावांवरच संपुष्टात आला. सिकंदर रझा याने ३४ धावा काढल्या तर रायन बर्ल ८३ धावा आणि वेस्ली एम.यावे ४० धावा केल्या. हे तीन फलंदाज सोडले तर इतर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या गोलंदाजांपुढे गुढघे टेकले.
याआधी स्कॉटलंडच्या संघाने फलंदाजी करताना ८ बाद २३४ धावा उभारल्या. मॅथ्यू क्रॉस (३८ धावा), ब्रँडन मॅकमुलन (३४ धावा) आणि मायकेल लिस्क (४८ धावा) यांनी स्कॉटलंडसाठी धावा उभारण्यात मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने तीन, तर तेंदाई चताराने दोन विकेट घेतल्या. महत्त्वाच्या या सामन्यात झिम्बाब्वे पराभवाला सामोरे जावे लागले तर स्कॉटलंडच्या मुख्य फेरीत जाण्याच्या आशा अद्याप आहेत.
हे ही वाचा:
अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख
केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका
विश्वासघात करणाऱ्यांनी परवानगीनंतरचं फोटो वापरावेत
अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार
सुपर सिक्समधील तक्ता
- श्रीलंका – ८ गुण
- स्कॉटलंड – ६ गुण
- झिम्बाब्वे – ६ गुण
- नेदरलँड – ४ गुण
- वेस्ट इंडीज – ० गुण
- ओमान – ० गुण