राज्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना पुण्यात मात्र झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. पुणे शहरात झिका व्हायरससह डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. पुण्यासह राज्यभरात झिकाचा धोका वाढला असून, झिकाची रुग्णसंख्या ही २५ वर पोहोचली आहे. झिकाचे सर्वाधिक म्हणजे २३ रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.
पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर आता महापालिकेची यंत्रणा अलर्ट झाली असून झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे. पुण्यात २५ रुग्ण, कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे.
झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील मोठी वाढ दिसून येत आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासोत्पत्ती जागा शोधून त्या नष्ट करण्याचे काम सुरू आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
झिका व्हायरस सहसा आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र, सुरुवातीला लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. पुण्यात झिकाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला, याचे उत्तर आरोग्य यंत्रणेला सापडत नसल्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन
१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले
१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अंगावर पुरळ उठणे अशी काही लक्षणे झिका व्हायरसची आहेत.