फरार इस्लामी कट्टरतावादी नेता झाकिर नाईकने पाकिस्तानमधील मंदिर फोडल्याचे समर्थन केले आहे. इस्लामी देशात मंदिरे असू नयेत आणि असली तर ती तोडली जावीत असे चिथावणीखोर विधान नाईकने केले आहे. झाकीर नाईकने एक व्हिडिओ प्रदर्शित करत ही मुक्ताफळे उधळली आहेत.
पाकिस्तान मधील खैबर-पख्तुनवा प्रांतात काही दिवसांपूर्वी जमावाकडून मंदिर फोडण्यात आले होते. या निंदनीय कृत्याचे समर्थन करण्यासाठी झाकिर नाईक पुढे सरसावला आहे. झाकिरच्या म्हणण्यानुसार इस्लाम कोणत्याही प्रकारच्या मुर्तींना मान्यता देत नाही. मग ते पेंटींग किंवा ड्राॅईंगच्या माध्यमात असो, अथवा कोणा जीवीत पशु-पक्षाची मुर्ती असो, किंवा मानवाची मुर्ती असो. या सर्वाला इस्लाममधे मनाई आहे आणि याचे अनेक पुरावे देखील आहेत.
पैगंबरांच्या जीवनाचा दाखला देत नाईक म्हणतो, “जेव्हा मोहम्मद पैगंबर काबामध्ये परतले तेव्हा त्यांनी काबामधे असलेल्या सुमारे ३६० मुर्ती फोडून उध्वस्त केल्या. इस्लामी राष्ट्रात मुर्ती बनलीच नाही पाहिजे आणि असेल तर तिला तोडलं पाहिजे. इस्लामी राष्ट्रात एकही मुर्ती असू नये.”
झाकिर नाईक हा कायमच वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. 2016 च्या ढाका बाँबस्फोटानंतर नाईक भारतातून फरार झाला आहे. त्याच्यावर भडकाऊ भाषणं देणे, दहशतवादाला फंडिंग करणे, मनी लाँडरींगसारखे गंभीर आरोप आहेत.