युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

भूषण कुमार आणि रवी भागचंदका हे या बायोपिकची निर्मिती करणार

युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास मोठ्या पडद्यावर

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंगचा क्रिकेट प्रवास आता क्रिकेट रसिकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. युवराज सिंगच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. यापूर्वीही क्रिकेटवर काही सिनेमे निघाले असून क्रिकेट चाहत्यांनी प्रेम या सिनेमांना दिले आहे.

स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूषण कुमार आणि रवी भागचंदका हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. बायोपिकमध्ये युवराज सिंगची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही मात्र, युवराज सिंगची भूमिका अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी साकारू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी युवराज सिंगने याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे. इनसाइड एज या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये सिद्धांतने क्रिकेटरची भूमिका साकारली होती.

युवराज सिंगने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात युवराज सिंग हा मालिकावीर ठरला होता. त्याने २०३ धावा करून १२ विकेट्स घेतल्या होत्या. २०११ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हाही युवराज सिंग ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. युवराज सिंगने २००७ च्या टी-२० विश्वचषकातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार मारून विक्रम केला होता.

हे ही वाचा :

‘बदलापूरच्या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका’

टिकैत म्हणतात, आम्ही २५ लाख शेतकऱ्यांना संसदेच्या दिशेने घेऊन जायला हवे होते !

४५ वर्षानंतर भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर, नरेंद्र मोदी रवाना !

पाकिस्तानी संसदेत आता ‘बंदोबस्ता’साठी मांजरींची नियुक्ती

युवराज सिंगने भारतासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. युवराज सिंगने कसोटीत एकूण १,९०० धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये युवराजने एकूण ८,७०१ धावा केल्या आहेत, ज्यात १४ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय युवराज सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,१७७ धावा केल्या आहेत.

Exit mobile version