बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने यूट्यूबर सुरेंदर उर्फ नातिकनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या सेवा भारती ट्रस्टला ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. न्या. एन. सतीश कुमार यांनी हा आदेश दिला.
यूट्यूबरवर ट्रस्टच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप होता. युट्युबरने सन २०२०मध्ये दोन ख्रिश्चन पुरुषांच्या कोठडीतील मृत्यूशी ट्रस्टचा संबंध जोडला होता. ‘कोणीही भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनात्मक अधिकाराचा वापर करून इतरांच्या खासगी आयुष्यावर आक्रमण करू शकत नाही किंवा त्यांची प्रतिष्ठा मलीन करू शकत नाही,’ असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.
‘केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बहाण्याने, इतरांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करून एखादी व्यक्ती मुलाखत घेऊ शकत नाही. कायदा यूट्यूबर्स आणि सोशल मीडियाला इतरांची प्रतिष्ठा मलीन करण्याचा परवाना देत नाही. त्यामुळे निरपराधांना लक्ष्य करून असे खोटे आरोप केले जातात, तेव्हा हे न्यायालय डोळे मिटून घेऊ शकत नाही,’ असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
‘आजकाल अशा प्रकारची विधाने लोकांना ब्लॅकमेल करण्याचे साधन म्हणूनही वापरली जातात. सुरुवातीच्या टप्प्यातच याला परावृत्त केल्याशिवाय, याचा अंत होणार नाही. अन्यथा प्रत्येक ब्लॅकमेलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून खोट्या आणि अनावश्यक बातम्या पसरवून इतरांना ब्लॅकमेल करेल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
“भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी तयार”
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
लोकसभेचे बिगुल वाजले; सात टप्प्यात होणार मतदान
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
सेवा भारतीने सुरेंदर यांच्याविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल नुकसान भरपाई आणि त्यांच्या विरोधात आणखी बदनामीकारक विधाने करण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स या दोन ख्रिश्चन पुरुषांच्या मृत्यूमध्ये कोणताही सहभाग नसताना आणि पोलिस कोठडीत असताना दोघांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले असताना सुरेंदरने यूट्यूच्या माध्यमातून संस्थेवर बिनबुडाचे आरोप केले,’ याकडे संस्थेने लक्ष वेधले होते.
सेवा भारती ट्रस्टचा उद्देश ‘ख्रिश्चन समुदायाला नष्ट करणे’ असल्याचा आरोप सुरेंदर यांनी केला होता. ‘व्हिडिओतील मजकूर बदनामीकारक होता आणि आरोपाला पुष्टी करणाऱ्या पुराव्याचीही त्यात कमतरता होती. परिणामी, ट्रस्ट निर्विवादपणे नुकसान भरपाईसाठी पात्र आहे,’ असा निर्णय न्यायालयाने दिला आणि सेवा भारती ट्रस्टला ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.