काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

युवक काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारणी बैठकीत दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामाऱ्या झाल्याची घटना नुकतीच घडली. पक्षात केवळ घराणेशाही सुरू असून प्रस्थापित नेत्यांच्याच मुलांनाच संधी दिली जाते असा आरोप युवक काँग्रेसचेच पदाधिकारी करत आहेत. काल शनिवारी याच विषयाला घेऊन काँग्रेस राष्ट्रीय प्रभारी व नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या झाल्याचे पाहायला मिळाले. प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असतानाच शनिवारी महाराष्ट्र युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र दिसले.

मुंबईत टिळक भवन येथे आयोजित युवक काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रभारी कृष्णा अलवरु यांना हटविण्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते आपापसात भिडले.राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवासन यांच्या समोरच हा हाणामारीचा प्रकार घडल्याने युवक काँग्रेसमधील नाराजी चर्चेचा विषय ठरला. या सर्व प्रकारामुळे श्रीनिवासन यांना पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करून थेट दिल्लीला रवाना होण्याची वेळ आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी दादर येथील टिळक भवन या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा:

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

१८० देशांमधील व्यक्तींसमोर मोदी करणार योग

मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

गुजरात दंगल : मिडीयाच्या दबावात हिंदूना गोवले

या बैठकीला राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवासन हे उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.या बैठकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त करत यांना हटविण्याची मागणी लावून धरली.या मागणीनंतर दोन गटात वाद झाल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या भिरकावत हाणामारी केली.विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन संपवून निघाल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.

या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मात्र कुणाल राऊत यांनी खुर्च्यांची फेकाफेकी झाली नसल्याचा दावा करत युवक काँग्रेसमध्ये मतभेद नसल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली.तसेच युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना विरोध केल्याने हाणामारी झाली असल्याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Exit mobile version