सोशल मीडियावर सापांशी ‘मैत्री’ नको!

सोशल मीडियावर सापांशी ‘मैत्री’ नको!

कुठल्याही वस्तीत साप घुसला की तिथे जाऊन साप पकडतानाचे व्हिडीओ काढायचे, सोबत फोटो काढायचे आणि मग ते फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करायचे असे प्रकार स्वयंघोषित सर्पमित्रांकडून वाढताना दिसत आहेत. या सर्व प्रकारांमुळे सापाविषयीची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आपणही असे स्टंट करू शकतो, अशी भावना तरुणांमध्ये रुजत आहे. यातून एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशी भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

सापांशी खेळण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटना मध्यंतरी घडल्या. त्या पार्श्वभूमीवर सर्पमित्र असल्याचे दाखवून जीवाशी खेळ नको, असा संदेश आता देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सापांबद्दल चुकीचे समज निर्माण होऊ नयेत म्हणून शहरातील स्वयंघोषित सर्पमित्रांना प्रशिक्षणाची गरज आहे. कोणताही सर्पमित्र प्राण्यांना हाताळू शकत नाही असे निर्देश आहेत. त्यामुळेच सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. प्राण्यांना हाताळताना कशी काळजी घ्यावी, त्यांचे वर्तन याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. नवीन जातीचे साप असल्यास त्यांना चटकन ओळखता यायला हवे. नागरिकांची जास्त गर्दी झाल्यास त्या गर्दीला हाताळता यायला हवे. अशा सर्व प्रकारचे प्रशिक्षण सर्पमित्रांना असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

पंजशीर विरुद्ध तालिबान

आता चिंता अफगाणिस्तानातून युरोपात होणाऱ्या स्थलांतराची

मध्य रेल्वे बांधणार १३ पादचारी पूल नव्याने

नक्षलवादाला गाडायाला सज्ज झाल्या ‘दुर्गा’

अनेक तरुण तरुणी या पकडलेल्या सापांसोबत फोटो आणि व्हिडीओ काढतात. सापाला हातात पकडून आणि गळ्यात टाकून या सापांना कसेही हाताळले जाते. अशा वेळी साप बिथरून दंश करू शकतो याचे भान यांना नसते. फोटोच्या हव्यासापोटी लहान मुलांनाही साप हाताळण्यासाठी दिले जातात. सर्पमित्रांना सापाविषयीचे वैज्ञानिक ज्ञान असणे आणि साप हाताळण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. सापांचा बचाव करण्यापूर्वी वन विभागाला कळवणे गरजेचे असते. तसेच पकडलेल्या सापांविषयी माहिती नोंद करून ठेवणे आवश्यक असते.

शहरातील जैवविविधता जपणे आवश्यक असते सापांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. साप पकडताना त्याचे निरीक्षण करून पकडायला हवा. सर्पमित्रांकडे स्वतःचे साहित्य असायला हवे. सध्या सोशल मिडीयावर अनेक सर्पमित्र आहेत, परंतु त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. सध्या साप कमी आणि सर्पमित्र जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे मत वन्यजीव अभ्यासक अभिजित पाटील यांनी सकाळ दैनिकाकडे व्यक्त केले आहे.

मानवी वस्तीपासून बचाव करून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम सर्पमित्र करत असतात. वनविभागाला त्याची मदत होत असते. सापाला इजा होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. १९७२ च्या वन्यजीव कायद्यानुसार या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते. यासाठी नागरिकांनी वन्यविभागाकडे तक्रार केल्यास स्टंटबाजी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी दिली आहे.

Exit mobile version