मूर्तिकार अरुण योगीराज यांनी घडविलेल्या बाल रूपातील मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा पार पडली. राम लल्लाची परिपूर्ण मूर्ती कोरताना मूर्तिकार अरुण योगीराज यांनी कशा प्रकारे आव्हानांचा सामना केला, कोणते अडथळे आले यावर त्यांनी भाष्य केले. काळ्या दगडावरील बाल रूपातील प्रभू श्री रामांची मूर्ती सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे. हा कौतुक सोहळा अनुभवण्यापूर्वी या मार्गात योगीराज यांना अनेक आव्हाने आली. अरुण योगीराज यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४’मध्ये बोलताना त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला.
अरुण योगीराज यांनी जून २०२३ मध्ये बाल स्वरूपातील प्रभू रामांचा पुतळा साकारण्यास सुरुवात केली. पुढे ऑगस्टपर्यंत जवळपास ७० टक्के काम त्यांनी पूर्ण केले होते. दरम्यान, अयोध्या राममंदिराच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी अरुण योगीराज यांना फोन करून दिल्लीला जाण्यास सांगितले. त्यावेळी ते करत असलेल्या कामाचे कौतुक करतील अशी अपेक्षा योगीराज यांना होती. पण, मिश्रा यांनी त्यांना सांगितले की, पांढऱ्या संगमरवरी दगडामधील मूर्तीसोबत आपण पुढे जाऊ शकत नाही. परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगताना मिश्रा यांनी अरुण योगीराज यांना सांगितले की, रामलल्लाचे शिल्प बनवणे हे महत्त्वाचे काम असल्याने राष्ट्राप्रती जबाबदारी आहे. तू तरुण आहेस आणि हातात दोन महिने आहेत.
यानंतर एक मिनिटही वाया न घालवता योगीराज यांनी सप्टेंबरपासून नव्या कृष्ण शिलेवर काम करण्यास सुरुवात केली. तसेच अरुण योगीराज यांनी सांगितले की, इतर दोन शिल्पकारही त्यांच्यासोबत शर्यतीत असल्याने स्पर्धा जास्त होती. प्रभूंनी खूप परीक्षा घेतली, असंही योगीराज म्हणाले. त्या काळात थोडेसे चिंताग्रस्त आणि त्रस्त असलेल्या योगीराज यांनी त्यांच्या आधीच्या कामांचे फोटो बघून त्यांच्या संभाव्य नैराश्याला आत्मविश्वासात बदलले. ‘वनवासा’ने प्रभू श्रीरामांना सोडले नाही तर आपण कोण? असंही योगीराज म्हणाले. अरुण योगीराज यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होताच त्यांनी राम लल्ला यांच्याशी संवाद साधला असल्याचेही योगीराज म्हणाले.
हे ही वाचा..
दिल्लीत रस्त्यावरच्या नमाजाला घातला पायबंद!
अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही
ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!
इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार फ्यूचर गेमिंगचे सँटियागो मार्टिन
प्रभू श्री रामांची मूर्ती साकारताना म्हैसूरस्थित मूर्तिकार योगीराज यांना आणखी एक ‘परीक्षा’ द्यावी लागली होती. काळ्या दगडांवर कोरीवकाम करणे कठीण असते. मूर्ती जवळून पाहण्यासाठी योगीराज यांनी त्यांच्या चष्मा काढला. तेव्हाच त्यांच्या उजव्या डोळ्यावर एक बारीक चीप (दगडाचा भाग) लागून दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी दोन दिवस आराम घेत सहकाऱ्याला काम सोपवले होते.