‘बाबरी मशिद पाडली, तिथेच राम मंदिराची उभारणी’

योगी आदित्यनाथ यांनी फेटाळला उद्धव गटाचा दावा

‘बाबरी मशिद पाडली, तिथेच राम मंदिराची उभारणी’

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे नेते संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिराचे गर्भगृह हे बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात आले नसल्याची टीका केली होती. मात्र या टीकेचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाचार घेतला आहे. बाबरी मशिद पाडली, त्याच जागी राम मंदिर उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा म्हणजे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा कार्यक्रम आहे,’अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.

‘काँग्रेसने १९४७पासून देशावर राज्य केले. तेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? राहुल गांधी हे सन २००४पासून खासदार आहेत आणि मागील दाराने यूपीएचे सरकार चालवत होते. हे काही गुपित राहिलेले नाही. तेव्हा ते राज्यघटनेचा अवमान करणारे कार्यक्रम आयोजित करत होते. ते संसदेत कागद फाडण्याचा कार्यक्रम करत होते,’ अशी टीका योगी यांनी केली.

हे ही वाचा:

माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’

विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा असल्याने आम्ही येऊ शकत नाही, कृपया कारवाई करू नये!

तसेच, आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राम मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेस त्यांच्या मतपेटीच्या राजकारणासाठी असे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘काँग्रेसने त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात अयोध्येतून केली नाही का? एकीकडे ते हिंदूंना मूर्ख बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांना मुस्लिम मतांचे आकर्षण सोडवत नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीच राजकारण केले नाही,’ असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. भाजपने नेहमीच लोकांच्या विश्वासाचा आदर केला, असे ते म्हणाले.

Exit mobile version