यशस्वी जयस्वाल, रोहित शर्माची शतके आणि विक्रमी भागीदारी

भारताने दोन विकेट गमावून ३१२ धावा केल्या

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्माची शतके आणि विक्रमी भागीदारी

कसोटी पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल याने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने केलेल्या विक्रमी भागिदारीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मजबूत पकड मिळवली. डॉमनिका येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने दोन विकेट गमावून ३१२ धावा केल्या असून पहिल्या डावात १६२ धावांची आघाडी घेतली आहे. जयस्वाल याने ३५० चेंडूंमध्ये नाबाद १४३ धावा केल्या. तर रोहित शर्मा याने २२१ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्या. सकाळच्या सत्रात धीमी सुरुवात करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंनी दुपारच्या सत्रात दमदार खेळाचे दर्शन घडवले.

 

तब्बल ४१ वर्षांनी दोन मुंबईकरांनी डावाची सुरुवात केली. तसेच, त्यांनी वेस्ट इंडिजविरोधात भारताने सन २००१मध्ये केलेला सर्वाधिक २०१ धावांच्या भागिदारीचा विक्रमही मोडला. त्या वेळी संजय बांगर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी २०१ धावांची भागीदारी केली होती. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी २२९ धावा करून हा विक्रम मोडला. तर, कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा यशस्वी हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी ही कामगिरी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी केली आहे.

हे ही वाचा:

…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

संस्कारावर बोलू काही…

आपले १०वे शतक ठोकल्यानंतर लगेचच रोहित शर्मा झेलबाद झाला. कसोटी पदार्पण करणाऱ्या ऍलिक ऍथेनेझच्या चेंडू टोलवण्याच्या नादात यष्टीरक्षक जोशुआ डिसिल्व्हा याला रोहितने सोपा झेल दिला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने १० चेंडूत केवळ सहा धावा केल्या.

 

द विंडसर पार्क येथील खेळपट्टी हळूहळू मंद होत होती, त्यामुळे फलंदाजांना खेळणे कठीण होत गेले. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू राहकीम कॉर्नवॉल हा एकमेव गोलंदाज फलंदाजांना अडसर ठरत होता. मात्र तो जखमी होऊन तंबूत परतल्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या आक्रमणाची धारच निघून गेली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली यानेही नाबाद ३६ धावा करून वेस्ट इंडिजवर आलेला दबाव कायम ठेवण्यात यश मिळवले. विराट आणि यशस्वी यांनी ७२ धावांची भागिदारी करून भारताला १६२ धावांची आघाडी मिळवून दिली.

Exit mobile version