भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरोधात पाच सामन्यांच्या घरगुती कसोटी मालिकेत ३-१ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेचा पुढील सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
२२ वर्षांच्या यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत दोनवेळा द्विशतक ठोकले आहे. यशस्वीने विशाखापट्टणम येथे २०९ धावांची खेळी केली होती. तर, राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात २१४ धावा केल्या होत्या. यशस्वीची बॅट अशीच तळपली तर तो पुढच्या कसोटीत आणखी काही विक्रम तोडू शकतो.
१. सुनील गावस्कर यांचा विक्रम…
पुढील सामन्यात यशस्वी हा महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा ५३ वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. सुनील गावस्कर हे कोणत्याही द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारे भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी सन १९७१मध्ये वेस्ट इंडिजच्या विरोधात पदार्पणातील कसोटी सामन्यात चार कसोटी सामन्यांत विक्रमी ७७४ धावा (द्विशतकासह चार शतके आणि तीन अर्धशतके) ठोकल्या होत्या. तेव्हा गावस्कर यांची सरासरी १५४.८० होती. हा कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा भारतीय विक्रम आहे. तर, इंग्लंडविरोधातील सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत आठ डावांत ६५५ धावा केल्या आहेत. जर यशस्वी उर्वरित दोन डावांमध्ये १२० धावा करू शकला, तर तो कोणत्याही द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकेल.
२. ब्रिटिशांच्या विरोधात एका कसोटी मालिकेत धावांचा विक्रम
यशस्वीने पुढील कसोटी सामन्यात एक धाव जरी केली, तरी विराट कोहलीचा एक विक्रम मोडण्याची संधी यशस्वीकडे आहे. इंग्लंडच्या विरोधात एका टेस्ट मालिकेत भारताकडून सर्वाधिक ६५५ धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. यशस्वीने यात विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता एक धाव केल्यास तो विराट कोहलीचा विक्रम मोडेल.
३. दिग्गजांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी
इंग्लंडविरोधात एका कसोटी मालिकेत दोन शतके ठोकल्याने यशस्वी आणि विराट कोहली संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यासोबत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यासह ११ क्रिकेटपटूही आहेत. तर, इंग्लंडविरोधात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक तीन शतके ठोकणारे क्रिकेटपटू म्हणून मोहम्मद अझरुद्दीन आणि राहुल द्रविड अव्वलस्थानी आहेत. द्रविडने अशी कामगिरी दोनदा केली आहे. अशा परिस्थितीत पुढील कसोटी सामन्यात दोन शतके ठोकून या सर्वांना मागे टाकण्याची सुवर्णसंधी यशस्वीकडे आहे.
४. सिक्सर किंग होण्याच्या जवळ
यशस्वीने या मालिकेत चार सामन्यांमध्ये एकूण २३ षटकार लगावले आहेत. अशा तऱ्हेने तो इंग्लंडविरोधात कसोटी सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. एकूण सर्व क्रिकेटपटूंचा विचार केल्यास यशस्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरोधात कसोटी सामन्यांत सर्वाधिक ३४ षटकारांचा विक्रम वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या नावावर आहे. त्यामुळे हा विक्रमही यशस्वीला खुणावतो आहे.
हे ही वाचा:
भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार
शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!
निवडणुकीत दारुण पराभव दिसू लागल्याने ठाकरेंचं ईव्हीएमवर बोट!
गौतम गंभीरनंतर खासदार डॉ.हर्षवर्धन यांचा राजकारणाला रामराम!
५. सर्वाधिक वेगवान एक हजार धावांचा विक्रमही मोडणार
कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत १५ डावांमध्ये ६९.३५च्या सरासरीने ९७१ धावा केल्या आहेत. जर त्याने या सामन्यात २९ धावा केल्या तर तो सर्वाधिक वेगाने एक हजार कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल. या प्रकरणी तो चेतेश्वर पुजारा याला मागे टाकेल. पुजारा याने १८ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तसे पाहिल्यास भारताच्या वतीने सर्वाधिक वेगाने एक हजार धावा करण्याचा विक्रम विनोद कांबळी (१४ डाव) यांच्या नावावर आहे.