हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची निर्माती कंपनी असणाऱ्या यश राज फिल्म्सने आपल्या आगामी चार चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारीख जाहीर केल्या आहेत. २०२१ च्या अखेरीस आणि पुढल्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीला हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात सर्व बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार काम करताना दिसणार आहेत.
भारतातील हिंदी चित्रपटसृष्टी ही जगातील काही सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. पण गेला काही काळ कोवीड महामारीमुळे या क्षेत्रावरही मोठे संकट कोसळले होते. देशभरातील अनेक ठिकाणी चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक चित्रपट हे प्रदर्शना वीना राहिले. तर काही चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावे लागले. पण आता देशभरातील सर्व चित्रपटगृहे पुन्हा सुरू होताना दिसत आहेत. महाराष्ट्र सरकारनेही याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे चित्रपट निर्माते हे चित्रपटगृहांमध्ये आपली कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
यश राज फिल्म्सने नुकतीच या संदर्भात मोठी घोषणा करताना आपल्या चार चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट १९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
हे ही वाचा:
मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात
महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार
पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे
अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व
तर अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात खिलाडी कुमार सोबतच मनुश्री चिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर या सिनेमाच्या मार्फत ‘चाणक्य’ मालिकेने प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी हे देखील आपल्याला पुनरागमन करताना दिसणार आहेत.
२५ फेब्रुवारी रोजी रणवीर सिंग आणि शालिनी पांडेचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर १८ मार्च रोजी रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त यांच्या भूमिका असलेला ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.