भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आंदोलकांनी आता सरकारला इशारा दिला आहे. आमच्या सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. यासाठीच्या चाचण्यांमध्ये सर्वांनी भाग घेणे आवश्यक आहे. तरच, त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता येईल.
ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी असणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने या संदर्भातील माहिती दिली. ‘जेव्हा सर्व समस्यांचे निराकरण होईल तेव्हाच आंदोलक कुस्तीपटू आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतील.’ आंदोलनाची भविष्याची दिशा ठरवण्यासाठी साक्षी मलिक या महापंचायतमध्ये भाग घेण्यासाठी सोनीपतला पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
कुस्तीपटूंच्या म्हणण्यानुसार, तक्रार मागे घेण्यासाठी कुस्तीपटूंवर दबाव आहे आणि म्हणूनच लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने तिचे विधान बदलले. खटला मागे घेण्यासाठी दबाव आणल्यामुळे मुलीचे वडील नैराश्यात आहेत, असा आरोप त्यांनी केला. ‘रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्या गेल्या, त्यातल्या काही खऱ्या तर काही चुकीच्या बोलल्या गेल्या. ब्रृजभूषणसिंह त्यांच्या जागी बरोबर आहेत परंतु रागातून काही खोट्या गोष्टी बोलल्या गेल्या. मी पुन्हा माझे म्हणणे मांडले आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या होत्या, त्या मी दुरुस्त केल्या आहेत,’ असे तक्रारकर्त्याने नमूद केले होते.
‘आमच्यावर तडजोड करण्यासाठी खूप दबाव आहे, ’ असे साक्षी मलिक यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले. ब्रृजभूषण यांच्या निकटचे लोक हे तक्रारदारांना धमक्या देत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या समस्या न सुटल्यास आशियाई खेळांमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी सर्व कुस्तीपटूंनी या स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
‘लडकी चीज ही ऐसी है…’ अजमेर दर्ग्याचे सरवार चिश्ती यांनी गुण उधळले
‘गदा’ कुणाकडे? भारत की ऑस्ट्रेलिया, भारताला हव्यात २८० धावा, ७ विकेट्स शिल्लक
शुभमन गिलला ढापला? सिध्देश्वर तलावात आढळले चतुर्मुखी शिवलिंग!
बजरंग पुनिया यांनी शनिवारी सकाळी सांगितले की, ते महापंचायत प्रतिनिधींसमोर सरकारशी त्यांचे म्हणणे मांडतील. “सरकारशी आमची जी काही चर्चा झाली आहे, ती आम्ही आमच्या समर्थकांपुढे मांडू,’ असे ते म्हणाले. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून महिलेची नियुक्ती, ब्रृजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित कोणालाही संघटनेत समाविष्ट करू नये, कुस्तीपटूंवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत, कुस्ती महासंघाची निःपक्षपातीपणे निवडणूक व्हावी अशा मागण्या आंदोलक कुस्तीपटूंनी केल्या आहेत. केंद्राने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर एम.सी. मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय निरीक्षण समिती स्थापन केली आहे.