‘फेक आंदोलन’ म्हणत बजरंग, साक्षी, विनेशविरोधात खेळाडूंनी दंड थोपटले!

जागतिक कुस्तीगीर संघटनेला पत्र लिहून केली तक्रार, सांगितली कुस्तीची अवस्था

‘फेक आंदोलन’ म्हणत बजरंग, साक्षी, विनेशविरोधात खेळाडूंनी दंड थोपटले!

भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात रान उठविणार कुस्तीगीर साक्षी मलिक, बजरंग पुन्हा आणि विनेश फोगाट यांच्या आंदोलनावर आता कुस्तीतल्या काही खेळाडूंनी संशय व्यक्त केला आहे. जागतिक कुस्ती संघटनेला पत्र लिहून या कुस्तीगीरांमुळे आम्हा कुस्तीगीरांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याची तक्रार या खेळाडूंनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या अल्पवयीन खेळाडूने बृजभूषण यांच्याविरोधात आरोप केले पण नंतर तक्रार मागे घेतली. तिन्ही जागतिक संघटनेला पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. आपले या आंदोलनामुळे झालेले नुकसान आणि आपली झालेली फसवणूक यांचा पाढा तिने वाचला आहे.

या तीन आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरांनी गेल्या वर्षी जानेवारीत बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन छेडले. बृजभूषण यांनी काही खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यातून एक आंदोलन उभे राहिले. हे तीन खेळाडू प्रामुख्याने सगळ्यात आघाडीवर होते. ज्यांचे आरोप होते त्या खेळाडू मात्र समोर आलेल्या नव्हत्या. मात्र आता कुस्तीची परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांच्या संघटनेला निलंबित करण्यात आले आहे. त्याजागी एक स्वतंत्र पॅनल नेमण्यात आले असून ते पॅनल आता कुस्तीच्या स्पर्धा, शिबिरे यावर देखरेख ठेवणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे कुस्तीत अभूतपूर्व असा गोंधळ माजला आहे. ऑलिम्पिक जवळ येत असताना कुस्तीची ही अवस्था झाल्यामुळे खेळाडूंपुढे गहन प्रश्न उभा राहिला आहे.

हे ही वाचा:

जपानमध्ये लँडिंगदरम्यान विमानाला भीषण आग!

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं, पाणबुडी प्रकल्प राज्यातचं!

‘एका न्यायाधीशाचे श्रेय नाही, अयोध्या खटल्याचा निर्णय हा सर्वसंमत’

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

ज्या खेळाडूंनी जागतिक कुस्ती संघटनेला पत्र लिहिले आहे त्यांनी हे आंदोलन बनावट असल्याचा आरोप केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या एका खेळाडूने पत्रात म्हटले आहे की, तीन खेळाडूंच्या बनावट आंदोलनामुळे भारतातील कुस्तीचे मातेरे झाले आहे. मी एक महिला खेळाडू आहे पण मला कधी लैंगिक शोषणाचा सामना याआधीच्या अध्यक्षांकडून करावा लागला नाही. मला वाटले की, कुस्ती संघटनेच्या निवडणुकीनंतर हा वाद संपुष्टात येईल पण हे आंदोलन करणारे कुस्तीगीर भारतीय कुस्तीचा नख लावत आहेत. मी अनेक महिला कुस्तीगीरांना भेटले पण कुणीही लैंगिक शोषणाबद्दल तक्रारीचा सूर लावला नाही.

आमची जागतिक कुस्ती संघटनेला नम्र विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि भारतातील कुस्ती संघटनेला स्थैर्य द्यावे. नाहीतर कुस्ती नष्ट होऊन जाईल.

जागतिक कुस्ती संघटनेने २४ ऑगस्ट २०२३ला भारतीय कुस्ती महासंघाने निलंबित केले होते. निवडणुका वेळेवर न घेतल्यामुळे ती कारवाई केली होती. त्यामुळे भारतीय कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेत त्रयस्थ खेळाडू म्हणून भाग घ्यावा लागला.

महाराष्ट्रातील एका ज्युनियर खेळाडूनेही तक्रार केली आहे. तिने म्हटले आहे की, ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धाच होत नसल्यामुळे आपल्या कारकीर्दीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. गेली दोन वर्षे सबज्युनियर, ज्युनियर स्पर्धाच झालेल्या नाहीत. आपली गुणवत्ता दाखविण्याचा आम्हाला संधीच मिळालेली नाही. आम्हाला न्याय द्या आणि आमची कुस्ती संघटना पुनर्जिवित करा.

ज्या अल्पवयीन खेळाडूने बृजभूषण यांच्याविरोधात प्रथम तक्रार केली होती पण नंतर माघार घेतली. तिनेही जागतिक संघटनेला पत्र लिहिले आहे. हे आंदोलन फेक आहे असा आरोप करत ती म्हणते की, मला काहीही झाले नव्हते. या तीन कुस्तीगीरांमुळे मी दबावाखाली आले. माझ्याकडून त्यांना काय हवे होते हे कळले नाही. माझ्या वडिलांवरील एक खोटी तक्रार करण्यास जेव्हा या खेळाडूंनी सांगितले तेव्हा मी त्याला नकार दिला. न्यायालयातही मी माघार घेतली. आता मला लक्षात आले आहे की, या तीन खेळाडूंनी आमची कारकीर्द बरबाद केली. मला या खेळाडूंचे कारस्थान लक्षात आले नाही. पण आता मला त्याचा खेद वाटतो. भारतातील कुस्ती लयाला जाऊ नये असे मला वाटते.

Exit mobile version