पुण्यश्लोक अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठेच्या कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभव सहन न झाल्याने शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर पकडून नंतर त्यांना लाथ घातली. शिवराजला पृथ्वीराज मोहोळने पराभूत केले. अंतिम फेरीत मोहोळविरोधातील खेळाडू महेंद्र गायकवाड पराभूत झाला पण त्याला निर्णय पसंत न पडल्याने तो चिडून बाहेर निघून गेला, त्यामुळे त्याच्यावर तसेच शिवराजवर तीन वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपान्त्य फेरीसाठी सामना रंगला असताना पंचानी दिलेला निर्णय पसंत न पडल्याने शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याने गोंधळ उडाला आहे. शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि त्यांची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
‘गेल्या दोन महिन्यांतील अखिलेश यादव यांचे ट्विट बघा, महाकुंभला फक्त विरोध दिसेल’
मालेगाव: बांगलादेशी/रोहींग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा, तिघांना अटक!
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
सायंकाळी सात वाजता हा उपांत्य फेरीचा सामना सुरु झाला होता. त्यावेळी शिवराज राक्षे याची पाठ मोहोळने टेकवली म्हणून पंचांनी शिवराजला पराभूत जाहीर केले. मात्र या निर्णयामुळे कुस्तीपटू शिवराज राक्षे संतापला आणि त्याने थेट पंचांनाच लाथ मारली. शिवराज राक्षे याने नंतर पंचाची कॉलर देखील पकडल्याने पोलिसांना हस्तक्षेप करीत हे भांडण सोडवावे लागले.
शिवराज राक्षे याने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो असे म्हटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर शिवराजचे प्रशिक्षक काका पवार म्हणाले, दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्षे वाया गेलेच ना.? वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते. जर शिवराजचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल तर त्यातून त्याला राग आला असेल, असेही काका पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवराजचे असे म्हणणे होते की, तिसऱ्यांदा आपल्याला सलग महाराष्ट्र केसरी जिंकण्याची संधी होती, ती हिसकावून घेण्यासाठी माझ्याविरोधात निर्णय देण्यात आला.
सलग तीन महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्याला सरकारी नोकरी दिली जाते.
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी
अंतिम सामन्यात पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड आमनेसामने आले होते. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर भारी पडला आणि त्याने सामना जिंकला. मात्र महेंद्रला निर्णय पसंत पडला नाही. त्याने निकालावर आक्षेप घेत मैदान सोडले. पंचांसोबत हमरीतुमरी झाल्यानंतर महेंद्र उघडाच मैदानाबाहेर गेला. आणि पृथ्वीराज मोहोळ ६७व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला आणि त्याला खांद्यावर घेऊन आखाड्यातच त्याची मिरवणूक काढली. पृथ्वीराज मोहोळ याने विजयानंतर आनंद व्यक्त केला. या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन पृथ्वीराज मोहोळचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची लढत पाहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती.