राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज ६० हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत आहे. देशभरात वरळी पॅटर्न या नावाने ओळखला गेलेल्या वरळी कोळीवाड्याला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा बसत आहे. गेल्या काही दिवसात वरळी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल १९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात तब्बल १९७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वरळी कोळीवाड्यातील ९७, जनता कॉलनी २१ आणि आदर्शनगरमध्ये ६९ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. वरळी कोळीवाडा भागात दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाड्यातील नगरसेविका हेंमागी वरळीकर यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?
… कारण ठाकरे सरकार निकम्मे आहे!
कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरळी कोळीवाड्यात कोरोना रूग्ण सापडल्यामुळे हा भाग सील करण्यात आला होता. तब्बल ६० ते ७० दिवस या भागातील नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. वरळी कोळीवाडा सील केल्यानंतर कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे प्रभावी योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हाच पॅटर्न पुढे ‘वरळी पँटर्न’ म्हणून संपूर्ण देशभरात चर्चिला गेला होता.