दोन बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर वरळी कोळीवाडा बस डेपो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तिथून बसने जाणाऱ्या लोकांमध्ये बस कुठून सुटणार याविषयी संभ्रम आहे. बस कुठून सुटणार याची लोकांना काहीही माहिती नाही. त्यामुळे बस डेपोजवळून शेअर टॅक्सीने जाण्याशिवाय लोकांपुढे पर्याय उरलेला नाही. बेस्टचे काही कर्मचारी बाहेर उभे राहून बसेस बंद असल्याचे आणि कुठून बस पकडता येतील ते सांगत आहेत. पण बस डेपो बंद का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी या डेपोजवळ एक १७ वर्षीय तरुणी प्रीती कोरी ही दोन बसच्या मधून चालत जात असताना चिरडली आणि मृत्युमुखी पडली. उभ्या असलेल्यापैकी एक बस मागे घेतली जात असताना ही घटना घडली. त्यावरून कोळीवाड्यात संतापाचे वातावरण आहे.
हे ही वाचा:
‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार
९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन
लोकांचा संताप बघून बेस्ट प्रशासनाने डेपोतून सुटणाऱ्या बसच बंद केल्या आहेत. बस डेपो सकाळपासून रिकामा आहे. पण बस कुठून सुटणार, कुठे त्यांचा थांबा आहे हे लोकांना कळायला मार्ग नाही. काही राजकीय पक्षांनी या घटनेची दखल घेत बेस्ट प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. मात्र हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा असल्यामुळे असे अपघात घडण्याची शक्यता जास्त आहे, असेही बोलले जात आहे. बस डेपोबाहेर उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे असे अपघात घडण्याची शक्यता वाढू शकते, असेही लोक बोलत आहेत. मंगळवारच्या या घटनेची रीतसर तक्रार दादर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.