आज जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन भारतात होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद अहमदाबादमध्ये या स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. या नवीन स्टेडियमला आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. भारताचे क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी काल या स्टेडीयमची पाहणी केली असून त्यासंबंधी ट्विट केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात अतिशय चुरशीची मालिका सुरू आहे. या मालिकेचा तिसरा सामना जगातील सगळ्यात मोठ्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातले सगळ्यांत मोठे क्रिकेटचे मैदान असून जगातल्या सर्व मैदानांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. या स्टेडियमच्या उदघाटन प्रसंगी गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले. यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की या भव्य स्टेडियमच्या निर्मितीनंतर अहमदाबादमध्ये सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हची निर्मिती पूर्ण होईल. या एन्क्लेव्हमध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळे खेळ खेळले जातील.
हे ही वाचा:
२०१५ साली जुने क्रिकेट स्टेडियम पाडून नव्या स्टेडियमच्या बांधकामाला सुरूवात झाली. या नव्या स्टेडीयमची कल्पना नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मांडली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट महामंडळाचे अध्यक्षही होते. या स्टेडियमच्या बांधणीसाठी तब्बल ८०० कोटी रूपये इतका खर्च आल्याचे समजते. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले असताना त्यांचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम याच मैदानावर पार पडला होता.