७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आजपासून देशभरात तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी चंदीगडमध्ये तिरंगा बनवण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. चंदीगड येथील क्रिकेट स्टेडियममध्ये मानवी साखळी करून तिरंगा फडकवण्यात आला. या साखळीत सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
१५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अभियानांतर्गत यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आजपासून हर घर तिरंगा यात्रा सुरू झाली आहे. यावेळी चंदीगडमधील सेक्टर १६ येथील क्रिकेट स्टेडियमवर सर्वात मोठ्या मानवी साखळीसह तिरंगा फडकवण्यात आला.
चंदीगड विद्यापीठाने या ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी, चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित आणि ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त, एनआयडी फाऊंडेशन उपस्थित होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी या विक्रमाची पडताळणी केली आणि ते म्हणाले, “राष्ट्रध्वज फडकावणाऱ्या सर्वात मोठ्या मानवी प्रतिमेचा यापूर्वीचा जागतिक विक्रम अबुधाबीमध्ये जेम्स एज्युकेशनने केला होता. संयुक्त अरब अमिरातीने २०१७ मध्ये ४ हजार १३० लोकांसह मानवी राष्ट्रीय ध्वजासह विश्वविक्रम केला होता. त्यानंतर भारतात चंदीगडमध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज बनवून हा विक्रम मोडला आहे.
हे ही वाचा:
चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या
यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या यशस्वी विश्वविक्रमाच्या निर्मितीने संपूर्ण जगाला मोठा संदेश दिला आहे. हा कार्यक्रम माझ्या कल्पनेपेक्षा मोठा झाला आहे. मी चंदिगड विद्यापीठाचे कुलपती आणि एनआयडी फाउंडेशनचे प्रधान संरक्षक एस सतनाम सिंग संधू यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, ज्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.