विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारून एकच खळबळ उडवून दिली. या विजयाचा शिल्पकार ठरलेला अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरान याला सामनावीराचा किताब मिळाला. त्याने हा पुरस्कार पाकिस्तानने अफगाणिस्तानला परत पाठवलेल्या लोकांना समर्पित केला आहे.चेन्नईतील चीपॉक स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आठ विकेटने पराभव करून एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट सामन्यात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.
चेन्नईमध्ये असा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर तो स्वतःसाठी आणि त्याच्या देशासाठी खूप खुश आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. अफगाणिस्तानने २८३ धावांचा पाठलाग करून विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या विजयाची नोंद केली.‘अशा प्रकारच्या मोठ्या सामन्यात मी अशी कामगिरी करू शकलो, यासाठी सर्वप्रथम मी त्या महान शक्तीचे आभार मानू इच्छितो. मला केवळ मैदानावर उतरून जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करून चांगल्या धावा करायच्या होत्या. मला माझ्याबद्दल आणि माझ्या देशाबद्दल खूप आनंद वाटतो आहे,’ अशी प्रतिक्रिया झादरान याने दिली. त्याने त्याचा जोडीदार रेहमानुल्लाह गुरबाझ याचेही कौतुक केले.
हे ही वाचा:
शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!
देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!
कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!
या दोघा सलामीवीरांनी १३० धावांची भागीदारी रचून अफगाणिस्तानला विजयपथावर नेले. ‘मी आणि गुरबाझने चांगल्या भागीदाऱ्या केल्या आहेत. आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, मी त्याच्यासोबत १६ वर्षांखालील सामन्यांपासून खेळतोय,’ असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याने सामनावीराचा पुरस्कार पाकिस्तानने अफगाणिस्तानला परत पाठवलेल्या व्यक्तींना समर्पित केला. झादरान याने ११३ चेंडूंत ८७ धावा केल्या. त्यात १० चौकारांचा समावेश आहे.या विजयामुळे अफगाणिस्तानने विश्वचषक स्पर्धेच्या गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, पाकिस्तान चांगल्या धावगतीच्या जोरावर पाचव्या स्थानावर कायम आहे. आता अफगाणिस्तानचा पुढचा सामना सोमवारी, ३० ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरोधात पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर होईल.