फिडे वर्ल्डकपमध्ये रौप्यपदक जिंकून उपविजेतेपद पटकाविणाऱ्या आर. प्रज्ञानंदचे चेन्नईत जंगी स्वागत करण्यात आले. चेन्नईच्या विमानतळावर प्रज्ञानंदचे आगमन झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी जयघोषात त्याचे स्वागत केले. इतके लोक याठिकाणी आले याचा मला आनंद आहे. ही बुद्धिबळासाठी खूप चांगली गोष्ट आहे, अशा शब्दांत प्रज्ञानंदने या स्वागताला उत्तर दिले.
तामिळनाडूच्या क्रीडा विभागाच्या वतीने प्रज्ञानंदचे स्वागत करण्यात आले. त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. शाल घालून पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. तामिळानाडूचे पारंपरिक नृत्यही इथे सादर करण्यात आले. या जंगी स्वागतामुळे प्रज्ञानंद भावूक झाला. पत्रकारांनीही त्याच्या गाडीला घेराव घालून त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या स्वागताबद्दल मी आभारी आहे, असे प्रज्ञानंद म्हणाला. त्यानंतर त्याला भारताचा तिरंगा देण्यात आला. तो त्याने हातात धरला.
प्रज्ञानंदने फिडे वर्ल्डकपमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध जबरदस्त खेळ केला. पहिल्या दोन फेऱ्यांत दोघांचीही बरोबरी झाली पण टायब्रेकरमध्ये त्याला हार मानावी लागली. या कामगिरीनंतर प्रज्ञानंदचे देशातच नव्हे तर जगातही कौतुक झाले.
प्रज्ञानंदची बहीण ग्रँडमास्टर वैशालीने प्रज्ञानंदच्या आगमनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली की, १० वर्षांपूर्वी विश्वनाथन आनंदने जागतिक अजिंक्यपद जिंकले होते त्यावेळी त्याचे असेच स्वागत झाले होते. प्रज्ञानंदच्या स्वागतावेळीही मी हेच वातावरण पाहात आहे.
हे ही वाचा:
कुर्ल्यात गुंडाने केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडली घटना
सोनिया, राहुल गांधीना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नेणार का?
चीनने जारी केलेल्या नकाशावर जयशंकर यांनी ठणकावले
कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर
प्रज्ञानंदच्या या यशात त्याच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. विशेषकरून त्याच्या आईने त्याला बुद्धिबळाकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दोन्ही मुले त्यामुळे केवळ बुद्धिबळाकडे वळली नाहीत तर त्यांनी या क्षेत्रात जागतिक स्तरावर नावही कमावले. त्याची आई तर त्याच्यासोबत परदेश दौऱ्यावर असताना प्रेशर कूकर, रस्समचे सगळे साहित्य घेऊन जाते. प्रज्ञानंदला रस्सम आवड़त असल्यामुळे त्याची चव त्याला चाखता यावी, त्यापासून तो वंचित राहू नये याची काळजी ती घेते. आपल्या मुलांचा वेळ टीव्ही पाहण्यात वाया जाऊ नये म्हणून त्यांच्या आईने जाणीवपूर्वक दोघांनाही बुद्धिबळाकडे वळवले.