वंडरलँडला २ जानेवारीपर्यंत ठोकले टाळे

वंडरलँडला २ जानेवारीपर्यंत ठोकले टाळे

कोरोना नियमांना फासण्यात येत होता हरताळ

बांद्रा रेक्लेमेशन येथे ख्रिसमस, नववर्ष याचे औचित्य साधून करण्यात आलेल्या विद्यतु रोषणाई आता २ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. बांद्रा रेक्लेमेशन वंडरलँड या नावाने याठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची तिथे उपस्थिती होती. पण लोकांची तिथे होणारी गर्दी आणि कोरोना नियमांना फासण्यात येणारा हरताळ या पार्श्वभूमीवर ही वंडरलँड बंद करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने हे जाहीर केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही वंडरलँड उभारण्यात आली आहे. तिथे होणाऱ्या गर्दीसंदर्भात ‘न्यूज डंका’ने वृत्त दिले होते. या गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचा होणारा भंग, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एकीकडे सरकारमधील नेते रोज कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास जनतेला सांगत असताना दुसरीकडे अशा वंडरलँडच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे दिसत होते.

या वंडरलँडमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोणतीही तपासणी होत नव्हती. त्यांनी दोन लशी घेतल्या आहेत का, त्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे का वगैरेची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे काही जागरुक नागरिकांनी त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले होते.

बांद्रा रेक्लेमेशन येथील ही भव्य रोषणाई एमएसआरडीसी (MSRDC) आणि जिओ (JIO) यांच्या मदतीने सरकारने केली आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन बाधितांची संख्या वाढत असताना या वंडरलॅंडमुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वंडरलॅंडमध्ये फिरताना सुरक्षित अंतर नागरिक पाळत नव्हते आणि बहुतांश लोक मास्क न लावताच फिरत होते.

भाजपा मुंबईचे सचिव प्रतिक कर्पे यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच अखेर मुंबईकरांच्या मागणीचा विचार करून वंडरलँड बंद करण्यात आल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. युवराज आणि इतरांना खास वागणूक देणाऱ्या पालिकेने अखेर मुंबईकरांचे ऐकले, असे कर्पे यांनी ट्विट केले आहे.

 

Exit mobile version