महिला आशिया कप २०२४ स्पर्धेचा थरार १९ जुलैपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे. भारताचा पहिलाचं सामना पाकिस्तानाविरुद्ध खेळवला जाणार आहे. यंदाची स्पर्धा ही नववी आवृत्ती असून यात आठ संघ सहभागी झाले आहेत. भारत, पाकिस्तान, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड या देशांचे महिला संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
आशिया कप २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ १९ जुलै रोजी आशिया कप स्पर्धेला पाकिस्तान विरुद्ध सुरुवात करणार आहे.
भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. ‘अ’ गटात भारतासोबतच पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईच्या संघांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या संघांना ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कप २०२४ चा अंतिम सामना २८ जुलै रोजी होणार आहे.
हे ही वाचा:
दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कोणाकडे राहायला होता याची चौकशी होणार
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक
ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटून १३ भारतीयांसह १६ जणांचा क्रू बेपत्ता
२००४ मध्ये प्रथम महिला आशिया कपचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत ही स्पर्धा आठ वेळा पार पडली असून भारतीय संघाने विक्रमी सात वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, बांगलादेश संघ एकदा बाजी मारू शकला आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन.
राखीव खेळाडू-
श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग
आशिया कप २०२४ मध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध पाकिस्तान (१९ जुलै)
- भारत विरुद्ध युएई (२१ जुलै)
- भारत विरुद्ध नेपाळ (२३ जुलै)