‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

२०१८ पासून योजना सुरु, आतापर्यंत सुमारे ६.५ कोटी रुग्णांवर रुग्णालयांत उपचार

‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

आयुषमान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयीन उपचार घेणाऱ्यांत ४८ टक्के महिला असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सन २०१८मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेंतर्गत सुमारे ६.५ कोटी रुग्णांवर रुग्णालयांत उपचार झाले. त्यांच्यावरील एकूण उपचाराचा खर्च ८१ हजार ९७९ कोटी रुपये झाला. त्यातील ३.२ कोटी रुग्ण या महिला होत्या. त्यांच्यावर ३९ हजार ३४९ कोटी रुपयांचे उपचार झाले. या योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्या १० राज्यांमध्ये एकूण पुरुष लाभार्थींपेक्षा अधिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मेघालय (६८%), अरुणाचल प्रदेश (५७%), छत्तीसगढ (५६%), नागालँड (५३%), झारखंड (५१%), त्रिपुरा (५१%) आणि जम्मू काश्मीर (५०%) असे या राज्यांतील महिला लाभार्थ्यांचे प्रमाण आहे. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या आजारावरील उपचारांचे लाभार्थीही पुरुषांपेक्षा महिला अधिक होत्या. त्यात कर्करोग (५६%), डोळ्यांवरील उपचार (५४%), कान-नाक-घशाशी संबंधितउपचार (५१%) आणि अर्भकांवरील उपचारांचा (५७%) समावेश होता.

हे ही वाचा:

‘त्यासाठी आधी अश्विन, जडेजाशी बोलावे लागेल’

सात्विक-चिराग जोडीची दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन चॅम्पियन्सला गवसणी!

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रॅव्हल बसवर गोळीबार

ठाकरे आणि पवार गटावर वंचित नाराज; मविआमध्ये लफडा असल्याची कबुली

‘आयुष्मान योजना ही हजारो आशासेविका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण देशभरात पोहोचते आहे. स्थानिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा पुरवणाऱ्यांमध्येही महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे एरवी या उपचारांपासून लांब राहणाऱ्या महिला मोठ्या संख्येने या आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत,’ असे आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे वैयक्तिक नोंदणी करायची नसल्याने अधिकाधिक महिला या आरोग्यसेवेचा लाभ घेऊ शकत आहेत.

आयुष्मान योजनेआधी दारिद्र्यरेषेखाली असणारे असंघटित क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना किंवा आरएसबीआय योजनेंतर्गत उपचाराचा लाभ मिळत असे. तेव्हा प्रत्येक कुटुंबाला केवळ एक कार्ड मिळत असे, तेही कमवती व्यक्ती असणाऱ्या पुरुषालाच मिळे. त्यामुळे अनेक महिलांना औषधोपचारासाठी किंवा रुग्णालयात जाण्यासाठी घरातील पुरुषांवर अवलंबून राहावे लागे, ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यानुसार आयुष्मान योजनेत बदल करण्यात आले. आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे कार्ड काढले जात असल्यामुळे आता घरातील महिलेला उपचारासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत सुमारे ३२ कोटी लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत नावनोंदणी केली असून त्यांना आयुष्मान कार्डे मिळाली आहेत. ‘योजना लागू झाली, तेव्हा सुरुवातीच्या दोन वर्षांत १० कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डे वितरित करण्यात आली. मात्र दोन वर्षांपूर्वीपासून आशासेविकांना यात सहभागी करून घेण्यात आल्यानंतर ही संख्या २०कोटींपर्यंत पोहोचली आहे,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version