२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, गान्दरबल जिल्हा पोलिसांनी शुक्रवारी एका व्हिडिओनंतर संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. या व्हिडिओमध्ये एका पर्यटक महिलेने सांगितले की, एका घोडे, खच्चर पुरवणाऱ्या व्यक्तीने तिला तिच्या धर्माबद्दल विचारले आणि त्याचाच फोटो दाखवला.
पोलिसांनी त्वरीत कारवाई करत संशयिताची ओळख अयाज अहमद जुंगल अशी पटवली. तो सोनमर्गमधील थाजवास हिमनदीत खच्चर सेवा पुरवणारा म्हणून काम करतो.
संशयिताची सध्या चौकशी सुरू असून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकता तिवारीचा दावा
उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील एकता तिवारी यांनी दावा केला की, त्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर जाहीर झालेल्या स्केचमधील दोन संशयितांशी २० एप्रिल रोजी खच्चर सफरीदरम्यान संपर्क साधला होता.
तिवारी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका व्यक्तीचा फोटो दाखवला, ज्याने लालसर रंगाचे जॅकेट आणि पायजमा घातला होता. त्या म्हणाल्या की, याच व्यक्तीने त्यांना धर्माबद्दल विचारले.
त्यांनी सांगितले की, हा फोटो बायसरण व्हॅलीमध्ये काढला गेला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मित्रमैत्रिणींना भीती वाटत होती,
तिवारी म्हणाल्या, “त्या व्यक्तीने माझं नाव आणि धर्म विचारला. अजमेर दर्गा किंवा अमरनाथला गेल्या आहात का, हेही विचारलं. मी सांगितलं की नाही, पण अमरनाथ यात्रा करण्याचा विचार करत होते. त्यावर तो म्हणाला की, नोंदणी न करता तुम्हाला यात्रा करता येईल आणि त्यांनी दिलेला संपर्क मला थेट तिकडे जाता येईल.”
एकताचे पती प्रशांत गौतम यांनी सांगितले, “आम्ही वैष्णोदेवी दर्शनासाठी बाहेर पडलो होतो. कटरा येथून दर्शन करून पूर्ण पॅकेज टूर घेतली होती. आमच्या ग्रुपमध्ये २० लोक होते.”
तिवारी म्हणाल्या, “मग त्याने विचारलं – तुला हिंदू धर्म आवडतो की इस्लाम? मी उत्तर दिलं – दोन्ही आवडतात. मग त्याने विचारलं, किती हिंदू-मुस्लिम मित्र आहेत आणि तू कधी कुराण वाचलंस का? मी सांगितलं की नाही, कारण मला उर्दू येत नाही. त्यावर तो म्हणाला – कुराण हिंदीतही उपलब्ध आहे.” त्यानंतर तिवारी यांना भीती वाटू लागली.
पुढे त्या व्यक्तीला एक फोन आला. तिवारी म्हणाल्या की, त्यात त्याने सांगितलं – “प्लॅन A ब्रेक फेल, प्लॅन B – ३५ बंदुका पाठवून व्हॅलीत गवतामध्ये ठेवल्या.” जेव्हा त्याला जाणवलं की तिवारी त्याचं ऐकत आहेत, तेव्हा त्याने दुसरी भाषा वापरायला सुरुवात केली.
ती व्यक्ती बराच वेळ बोलत होती. जेव्हा विचारलं की तो स्थानिक वाटला का, तिवारी म्हणाल्या – तो काश्मीरमध्ये राहणारा पाकिस्तानी वाटत होता. तो म्हणाला की, तो कुराण शिकवतो आणि गेल्या ७ वर्षांपासून तिथे आहे.
हे ही वाचा:
गुजरातमधून ५५० हून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना घेतलं ताब्यात
पाकिस्तानची मग्रुरी सुरूचं; नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणी गोळीबार
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर धोनी म्हणाला – आम्ही १५-२० धावांनी मागे होतो
नौदल अधिकारी विनय नरवालच्या अस्थी विसर्जित करताना वडिलांचा बांध फुटला
जेव्हा विचारलं की, हे सर्व पोलिसांना का सांगितलं नाही, तिवारी म्हणाल्या – तिथे कुठेही टुरिस्ट बूथ दिसला नाही. पहलगामच्या ७–८ किमी आधी एक चेकपोस्ट होतं, पण तिथे कोणताही पोलीस किंवा सुरक्षा नव्हता.
त्यांच्या म्हणण्यानुसार, स्केचमधील दोन पुरुष खाली उतरताना अचानक गायब झाले. खात्रीबाबत विचारल्यावर त्या म्हणाल्या – “मी २००% खात्रीने सांगते की हेच ते लोक होते – त्यांनी ३५ बंदुकांबद्दल आणि धर्माबद्दल विचारलं होतं.”