भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जनसामान्यांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. सोशल मीडियातून आपल्या समस्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवता येतील आणि ते आपले म्हणणे ऐकतील या विश्वासातून एका महिलेने शेअर केलेला व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदींशी आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियातून संवाद साधला तर आपले काम नक्की होईल, असा विश्वास त्या महिलेच्या व्हीडिओतून दिसत होता.
मध्य प्रदेशातील शिवानी साहू नावाच्या एका महिलेने सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ बनवून नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, आपल्या गावातील रस्ता बनवून द्यावा, अशी मागणी तिने केली. मोदींपर्यंत आपले हे आवाहन पोहोचलेच पाहिजे असा आग्रह देखील तिने धरल्याचे दिसते.
हे ही वाचा:
ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ
नसलेल्या मिशीला पीळ द्यायचा कशाला?
हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने
शिवानी त्या व्हीडिओत म्हणत आहे की, मोदीजी, आमच्या गावातील हा रस्ता पाहा. हा रस्ता आम्हाला बनवून द्या. मध्य प्रदेशातून भाजपाचे सगळे खासदार निवडून आले आहेत. मग आमच्याकडे रस्ते तरी बनवा आता. यासाठी आम्ही इथल्या सगळ्या आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो पण कुणीही ऐकत नाही. म्हणून हा व्हीडिओ बनवून मी सांगत आहे की, कृपया या रस्त्यांची अवस्था पाहा आणि आम्हाला नवा रस्ता द्या. आमच्या गावाचे नावही कृपया लक्षात घ्या. खड्डीखुर्द, जिल्हा सिधी याठिकाणी हे गाव आहे. जरी हा जंगलाचा भाग असला तरी रस्ता तर हवा ना. विशेषतः पावसाळ्यात हाल खूप वाईट असतात. म्हणून ही गोष्ट मोदींजींकडे जायलाच हवी.