लांबणीवर पडलेल्या पावसामुळे सर्वांच्याच मनात चिंतेचे ढग साचले होते. मात्र उशिरा आगमन होऊनही १२ दिवसांतच पावसाने तूट भरून काढली आहे. १२ दिवसांपूर्वी ३० टक्के असणारी तूट आता केवळ ५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
२४ जुलैपासून पडणाऱ्या पावसाने आता संपूर्ण देश व्यापला आहे. विशेषत: मध्य आणि दक्षिण भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक होती. तिथेही पाऊस पडत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.
मात्र पुढील काही आठवडे असाच संततधार पाऊस पडेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अर्थात पावसाने अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. गुरुवारपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून देशभरातील ३६ हवामान उपविभागांपैकी १६ उपविभागांमध्ये अद्याप २० टक्के आणि त्याहून अधिक तूट नोंदली गेली आहे. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र (किनारीभाग वगळता), तेलंगणा, छत्तीसगड, ओदिशा, झारखंड, बिहार आणि प. बंगालमधील काही भागांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
देशाचा विकास मुख्य उद्देश ठेऊन एकनाथ शिंदेंना साथ
गुहागारच्या कासवाचा श्रीलंका दौरा
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ; सहा गुन्हे दाखल
खोटी बातमी देणाऱ्या माध्यमाविरोधात पंकजा मुंडे करणार मानहानीचा दावा
अर्थात, गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसामुळे ही तूट कमी होत आहे आणि आगामी आठवड्यांत आणखी पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. ’सद्य परिस्थितीतील निदर्शकांनुसार, जुलैमध्ये सरासरी ९४ टक्के ते १०६ टक्के पाऊस पडेल. सध्याची सक्रिय मान्सून परिस्थिती पुढील दोन आठवडे कायम राहील,’ असे हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा यांनी सांगितले.
सध्या मान्सून मध्य भारतात सक्रिय आहे. ८ जुलैदरम्यान तो भारताच्या गंगाखोऱ्यापर्यंत विस्तारेल. त्यानंतर १२ जुलै रोजी पुन्हा दक्षिणेकडे वळेल आणि मध्य भारतात पुन्हा पाऊस पडेल, असे ते म्हणाले. या कालावधीत खरीप पिकांची लागवड होत असल्याने जुलै महिन्यात पाऊस पडणे अतिशय महत्त्वाचे आहे.