‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सागरी मोहिमेची दिली माहिती

‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार

चांद्रयान- ३ च्या यशानंतर भारत आता नव्या सागरी मोहिमेची तयारी करत आहे. या प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. यामुळे समुद्राच्या उदरातील अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारत एक सबमर्सिबल बनवत आहे, ज्याला ‘मत्स्य ६०००’ असे नाव देण्यात आले आहे. समुद्रात ६००० मीटर खोलवर शोध घेण्याच्या उद्देशाने हे सबमर्सिबल तयार केले जात आहे. ही सबमर्सिबल तीन लोकांना समुद्रात ६ हजार मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असेल. रिजीजूंनी माहिती दिल्यानुसार, याआधी भारताने 7000 मीटर खोलीपर्यंत मानवरहित पाणबुडी पाठवण्याचे मिशन पूर्ण केले आहे. आता मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

भारताच्या या सागरी मोहिमेला ‘समुद्रयान मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. तसेच ज्या सबमर्सिबलमधून लोकांना समुद्रात खोलवर नेले जाईल त्याच्या तपासणीचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल. ही पाणबुडी टप्प्याटप्प्यानी तयार केली जात आहे.

ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. एका वेळी तीन लोक बसण्याची यात क्षमता आहे. यावर सेन्सर बसवलेले असून ही अत्याधुनिक पाणबुडी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असणार आहे. याचा संपूर्ण प्रवास १२ कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘मत्स्य ६०००’ सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सत्तेत बसलेले लबाड, बेईमान नाहीत; संभाजी भिडेंनी जरांगे पाटलांना दिला विश्वास

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार; तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

G-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

‘मत्स्य ६०००’ ची क्षमता १२ तास असून मानवी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत ९६ तासांपर्यंत टिकू शकते. २०२६ मध्ये या मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक प्रगती व्यतिरिक्त, ही मोहीम पाण्याखालील पर्यटन आणि सागाराच्या उदरातील रहस्य उलगडण्याला चालना देईल.

Exit mobile version