केरळच्या मल्लापूरम येथील एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. शिवाय, हा व्हीडिओ वेदना देणाराही आहे. मल्लापूरम येथील एक झाड कापतानाचा हा व्हीडिओ असून झाड खाली कोसळल्यावर त्यावरील पक्ष्यांची अनेक घरटी रस्त्यावर पडतात आणि त्यात अनेक पिल्ले मृत्युमुखी पडतात. भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांनी हा व्हीडिओ शेअर केला असून त्याखाली लिहिले आहे की, घर सगळ्यांना हवे असते. आपण किती क्रूर बनणार आहोत. हा व्हीडिओ पाहून लोकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रवीण कासवान या अधिकाऱ्याने हा व्हीडिओ शेअर केला आणि तो पहिल्या सात तासांत तब्बल ७ हजार वेळा रिट्विट झाला.
या व्हीडिओत एक जेसीबी राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी झाड तोडत असल्याचे दिसते. ते झाड खाली कोसळल्यावर त्यावरील घरटीही रस्त्यावर कोसळतात आणि त्यातील पक्ष्यांची पिल्ले मरतात. हे झाड कोसळल्यावर काही पक्षी आपला जीव वाचविण्यासाठी उडतात पण अनेक पिल्ले जी उडू शकत नाहीत ती मात्र खाली पडल्यावर मृत्युमुखी पडतात. २० सेकंदांचा हा व्हीडिओ सर्वांना दुःख देतो.
हे ही वाचा:
नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार
दारूबंदी अधिकारीच दारू पिऊन गतप्राण
‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली
विरारच्या तरुणाने भारताचा झेंडा अटकेपार रोवला
या घटनेनंतर केरळ वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत मान्यता नसतानाही हे झाड पाडले गेल्याचेही समोर येते आहे. जी व्यक्ती जेसीबी चालवते त्यालाही अटक करण्यात आली आहे.
केरळचे वनमंत्री ए.के. श्रीधरन यांनी ही घटना क्रौर्याची परिसीमा असल्याचे म्हटले आहे. वन विभागाची परवानगी न घेताच हे झाड तोडण्यात आल्याचे श्रीधरन म्हणतात. जोपर्यंत एखाद्या झाडावरील पक्षी आणि त्यांची पिल्ले उडून जात नाहीत, तोपर्यंत ते झाड कापू नये अशा सक्त सूचना आहेत. तरीही असे कृत्य करण्यात आले आहे. जे या घृणास्पद कृत्यात सामील आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे केरळ सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मोहम्मद रियास यांनी म्हटले आहे.