राज्यातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे आणि युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवार, २६ ऑगस्ट रोजी दिली आहे.
देशातील इतर राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. त्यामुळे राज्यात ही बक्षीस रक्कम आता जवळपास पाचपट वाढविण्यात आली आहे. तसेच खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्या बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नौटंकी’
न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ
‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट
पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम ५० लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी साडेसात लाख रुपयांऐवजी ३० लाख रुपये करण्यात आली आहे, तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंची बक्षीस रक्कम पाच लाख रुपयांऐवजी २० लाख रुपये करण्यात आली आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना साडेबारा लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना साडेसात लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना पाच लाख देण्यात येणार आहेत.