२००व्या टी-२० सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून पराभूत

२००व्या टी-२० सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून पराभूत

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजच्या संघाने चार धावांनी मात करून या पाच सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी २० षटकांत सहा विकेट गमावून १४९ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ नऊ विकेट गमावून केवळ १४५ धावाच करू शकला. तिलक वर्मा व्यतिरिक्त कोणीही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही आणि भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला.

 

हा भारताचा २००वा टी-२० सामना होता. इतके सामना खेळणारा भारत हा दुसरा संघ आहे. याआधी पाकिस्तानचा संघ २००हून अधिक टी२० सामने खेळला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल याने ४८ तर, पूरनने ४१ धावा केल्या. तर, ओबेड मॅकॉय, जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताकडून सर्वांत जास्त ३९ धावा तिलक वर्माने केल्या. अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

 

वेस्ट इंडिजने फलंदाजीला उतरल्यानंतर चांगली सुरुवात केली. ब्रेंडन किंग याने पहिल्याच षटकापासून चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे दोन षटकांतच धावसंख्या २०च्या पुढे गेली होती. तर, दुसऱ्या बाजूला मेयर्स याला सूर सापडत नव्हता. पाचव्या षटकांत चहलने मेयर्सला वाद केले. त्याने सात चेंडूंत केवळ एक धाव केली. त्यानंतर आलेल्या किंगने १९ चेंडूंत २८ धावा केल्या आणि तोही बाद झाला. स्पिनर चहल आणि कुलदीप यादव यांनी विंडिजच्या खेळाडूंना धावा करण्यापासून रोखले.

 

१५० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. धावफलकावर पाच धावा असतानाच भारताचा पहिला फलंदाज शुभमन गिल नऊ चेंडूंत केवळ तीन धावा करून बाद झाला. अकील हुसैन या डावखुऱ्या गोलंदाजाने त्याला बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमारने झटपट धावा केल्या, मात्र ईशान किशन फारशा धावा करू शकला नाही. तो नऊ चेंडूंत केवळ सहा धावा करू शकला. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागिदारी केली. नंतर सूर्यकुमारही २१ चेंडूंत २१ धावा करून बाद झाला. तर तिलक २२ चेंडूंत ३९ धावा करून तंबूत परतला.

हे ही वाचा:

पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी

हरयाणातील हिंसाचारानंतर नूँहमध्ये बुलडोझर चालला

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका; चकमकींमध्ये २१ जण जखमी

अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!

कर्णधार हार्दिक पांड्याने संजू सॅमसनच्या साथीने भारतीय बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या पाच षटकांत भारताला केवळ ३७ धावा हव्या होत्या आणि सहा विकेट शिल्लक होत्या. मात्र १६व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर होल्डरने कर्णधार हार्दिकला त्रिफळाचीत केले. हार्दिकने १९ चेंडूंत १९ धावा केल्या. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनही बाद झाला. संजूने १२ चेंडूंत १२ धावा केल्या.

 

 

भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी अक्षर पटेलवर होती. त्याने कुलदीपच्या साथीने १६ धावा केल्या. मात्र १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात अक्षर बाद झाला. अक्षरने ११ चेंडूंत १३ धावा केल्या. भारताला अखेरच्या ११ चेंडूंमध्ये २१ धावा हव्या होत्या. तेव्हा अर्शदीपने मॅकॉयच्या दोन चेंडूंवर दोन चौकार लगावल्याने भारताला पुन्हा विजयाची आशा वाटू लागली. शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी १० धावा हव्या होत्या. शेफर्डने पहिल्या चेंडूवर अर्शदीपला त्रिफळाचीत केले. नंतरच्या पाच चेंडूंत अर्शदीप, चहल आणि मुकेश केवळ पाच धावाच करू शकले आणि भारत चार धावांनी पराभूत झाला.

Exit mobile version