‘लसीकरणापूर्वी शाळा सुरू करता येऊ शकतात’

‘लसीकरणापूर्वी शाळा सुरू करता येऊ शकतात’

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आणि कॉलेज आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा सुरू करण्याबाबत परदेशातील जाणकारांनी सध्याची कोरोनामुळे असणारी परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांच्या आधारे अभ्यास केला आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या आवृत्तीसाठी चार शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील मुले आणि तिथली परिस्थिती डोळ्यासमोर ठेऊन त्या अभ्यासानुसार आपली मते मांडली. अमेरिका आता कोविड लाटांच्या मध्यात आहे, पण ५० टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ९० टक्के शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. जास्तीत जास्त प्रौढांचे लसीकरण झाल्यावर त्याचा फायदा प्रौढांसोबतच अप्रत्यक्षपणे लहान मुलांना होत असतो. प्रौढांच्या लसीकरणामुळे लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ५० टक्के कमी झाली आहे.

इंग्लंडमध्येही लसीच्या मदतीने लोकांनी पुन्हा पहिल्या सारखे जीवन जगायला सुरुवात केली आहे. तिकडच्या शाळा सुरू झाल्या असून १६ ऑगस्ट पासून शाळेमध्ये मास्क आणि सुरक्षित अंतराचे बंधनही त्यांना नसणार आहे, अशी माहिती बीबीसीने दिली आहे. भारतामध्ये निम्म्या लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण होण्यासाठी अजून काही महिने जातील. अंदाजाने पुढील वर्षी भारतातील शाळा सुरू होतील पण त्यापूर्वीच शाळा सुरक्षितपणे सुरू करणे शक्य आहे का?

जगभरातील अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, लहान मुलांची कोरोनामुळे गंभीर आजारी पडण्याची शक्यता फारच कमी आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिकच्या माहितीच्या आधारे “फक्त ०.१ टक्के ते १.९ टक्के लहान मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते.” अशी माहिती द वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केली आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध या अमेरिकेच्या संघटनेने मार्चमध्ये जेव्हा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले नव्हते, तेव्हा शाळा सुरू करण्यासंबंधी सुचवल्यावर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेत मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते असे पालकांनी सांगितले होते. परंतु कॅसेन्द्रा विलयर्ड यांनी नॉर्थ करोलिना येथील केलेल्या अभ्यासाच्या आधारे सांगितले की, नऊ आठवडे ९० हजार शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले असता, ९०० रुग्णसंख्या अपेक्षित होती पण केवळ ३२ रुग्णच सापडले. त्यामुळे लहान मुले ही बाहेरील परिस्थितीपेक्षा शाळेत अधिक सुरक्षित असतात.

हे ही वाचा:

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

हुश्श…पुजारा, रहाणेला सूर गवसला

पवनदीप झाला इंडियन आयडल

भारताच्या स्वातंत्र्य दिनी लंडनमध्ये मोदी विरोधाची उचकी

सॉल्ट सिटीमध्ये शास्त्रज्ञांनी संसर्ग कुठून होत असल्याचे निश्चित करण्यासाठी अनुवांशिक अनुक्रमाचा वापर केला. या अभ्यासानुसार ५१ कोरोना पॉझिटीव्ह विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ७०० विद्यार्थी आणि शिक्षकांची चाचणी करण्यात आली. त्यातील केवळ १२ जणांना संसर्ग झाला होता आणि पुढे अनुवांशिक अनुक्रमानुसार त्यातील फक्त पाच जणांना शाळेतून संसर्ग झाला होता आणि बाकीच्यांना शाळेबाहेरून संसर्ग झाला होता.

भारतासारख्या कमी लसीकरण झालेल्या देशात शाळा सुरू करताना मास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळावे लागतील. इस्रायल सारख्या देशात कोरोना प्रबंधासाठीच्या नियमांना शिथिलता दिल्यावर दोन कोरोना पॉझिटीव्ह विद्यार्थ्यांमुळे १५३ विद्यार्थी आणि २५ कर्मचारी बाधित झाले होते. सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. नीरज सूद यांनी सांगितले की, मुलांचे कोरोनापासून संरक्षण करताना त्यांच्या मानसिकतेला धोका पोहोचत आहे. मुलांच्या संपूर्ण स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

शाळा सुरू करण्याचा निर्णय झालाच तर मुलांना कोरोनापासून सुरक्षित ठेवणे तितके कठीण नाही, असे जाणकारांनी सांगितले. मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. वर्गातील हवा खेळती ठेवणे, एसीचा वापर टाळणे अशा प्रकारे शाळांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. भारतात लहान मुलांसाठी अजून लस आलेली नाही त्यामुळे तोपर्यंत पालक लस घेऊन मुलांची आणि घरच्यांची काळजी घेऊ शकतात. सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन केल्यास शाळा पूर्ववत सुरू करणे शक्य आहे.

Exit mobile version