सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला जाहिरातींच्या बाबतीत कडक शब्दांत फटकारले आहे. पतंजलीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करायला सांगितले आहे, अन्यथा १ कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पतंजली विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.पतंजली जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला होता.यावर सुनावणी करताना न्यायालयाने आपले मत मांडले आहे.
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने पतंजली कंपनीला खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळण्यास सांगितले आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्देशांमध्ये पतंजलीला कोणत्याही प्रकारे दिशाभूल करणाऱ्या दाव्यांचे प्रकाशन आणि प्रसारण टाळण्यास सांगितले आहे. तसेच कंपनीने प्रेसमध्ये कोणतीही आकस्मिक विधाने केली जाणार नाहीत याची खात्री करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.
हे ही वाचा:
नामदेवराव जाधवांना काळं फासणाऱ्यांवर जरांगेंचे मौन…
BYJU’S ने ९,००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप!
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या साथीदाराला ठोकल्या बेड्या
धनगर आंदोलकांनी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गाडी फोडली
न्यायालयाने म्हटले की, “पतंजली आयुर्वेदाने आपल्या सर्व खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ताबडतोब थांबवायला हव्यात. अशा कोणत्याही उल्लंघनाबाबत न्यायालय अतिशय गंभीरपणे विचार करेल आणि जाहिरातीने “क्युअरिंग”चा खोटा दावा केल्यास न्यायालय प्रति जाहिरात १ कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावेल. “न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, आम्ही याला अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद या वादात बदलू इच्छित नाही, परंतु वैद्यकीय उपचारांशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा प्रश्न शोधला पाहिजे.
ही समस्या गंभीर असल्याचे सांगून खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांना सांगितले की, या समस्येला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारला तोडगा काढावा लागेल. सरकारला विचारविनिमय केल्यानंतर योग्य शिफारशी सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.