चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का? 

अलीकडेच सी बी आय ने  चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि विडीओकोन समूहाचे वेणुगोपाल धूत यांना अटका करून त्यांची कस्टडी मिळवली.  त्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे :

१. ऑगस्ट २००९ मध्ये चंदा कोचर आय सी आय सी आय बँकेच्या अध्यक्षपदी  असताना विडिओकॉनला ३०० कोटी रुपयांचे कर्ज ‘नियम आणि बँकेच्या पतविषयक धोरणांचे उल्लंघन करून’ दिले गेले, असा सी बी आय चा आरोप आहे. अलीकडेच  झालेल्या अटका, आणि आरोपींना देण्यात आलेली सी बी आय कस्टडी , यावरून या आरोपात सकृद्दर्शनी तथ्य असणार, हे उघड आहे. मग असे असताना २०११ मध्ये चंदा कोचर यांना ‘पद्मभूषण’ सारखा उच्च नागरी सन्मान कसा दिला गेला ? हे नागरी सन्मान देताना निवड समिती नेमके कोणते निकष लावते ? समजा सन्मान देताना काही (मानवी)  चूक / दुर्लक्ष झाले असेल, असे धरले, तरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे, व्यक्तीच्या ज्या कार्य कर्तृत्वासाठी तिला एखादा सन्मान दिला गेला, त्या कर्तृत्वाखेरीज आणखी काही वेगळ्या प्रकारचे ‘कर्तृत्व’ (?)  पुढे काही काळानंतर लक्षात आले, तर हे असे ‘नजरचुकीने’ दिले गेलेले सन्मान परत का घेतले जाऊ नयेत ?  भविष्यात समजा त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर संबंधित सर्व कागदपत्रांवर “पद्मभूषण चंदा कोचर” हा उल्लेख झाल्यास ते कसे दिसेल ? “पद्मभूषण” पुरस्काराची प्रतिष्ठा तिथे धुळीला मिळणार नाही का ?

२. या संदर्भात आणखी थोडी खोलात जाऊन माहिती घेतल्यावर लक्षात येते, की सुदैवाने अशी तरतूद पद्म पुरस्कारांच्या नियमावलीत आहे.

१२ फेब्रुवारी २०१९ रोजी, लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात गृहखात्याचे राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यासंबंधी माहिती दिलेली आहे. त्यानुसार हे पुरस्कार (गैरवापर, इत्यादी) अपवादात्मक परिस्थितीत काढून घेतले जाऊ शकतात. त्यांनी हे स्पष्ट केले, की पद्म पुरस्कार, हे राज्य घटनेतील अनुच्छेद 18(1) मध्ये उल्लेख असलेले “किताब” नव्हेत. त्यामुळे ते अर्थातच, व्यक्तीला आपल्या नावाच्या पुढे / मागे कधीही लावता येत नाहीत. त्यांनी पुढे असेही सांगितले, की गैरवापर / गैरकृत्य घडल्याचे आढळल्यास, पुरस्कारीत व्यक्तीने पद्म पुरस्कार नियमावलीतील नियम 10 मधील प्रक्रियेनुसार आपल्याला देण्यात आलेला पुरस्कार परत करणे अभिप्रेत आहे. ह्या नियम 10 मध्ये पुढे असेही नमूद आहे, की राष्ट्रपती  अशा व्यक्तीचा पुरस्कार  (आपल्या अधिकारात)  रद्द / निरसित करू शकतात , आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव पुरस्कारीतांच्या यादीतून (संबंधित रजिस्टर मधून) काढून टाकले जाईल, आणि त्या व्यक्तीला पुरस्कार परत करावा लागेल.

अहिर यांनी त्यांच्या उत्तरात असेही सांगितले, की पुरस्कार दिला गेल्यानंतर लगेचच, प्रत्येक पुरस्कारीत व्यक्तीला ह्या नियमावलीची माहिती दिली जाते. त्यामुळे चंदा कोचर यांना ही माहिती असणारच.

३. त्यामुळे आता  प्रश्न असा आहे, की सरकारने चंदा कोचर यांची विवेकबुद्धी (?) जागी होऊन, त्या आपणहून आपला “पद्मभूषण” पुरस्कार परत करतील, याची वाट न बघता, राष्ट्रपतींना त्यांनी आपल्या अधिकारात त्यांचा पुरस्कार काढून घेण्याची शिफारस करावी. ह्यामुळे “पद्मभूषण” पुरस्काराची प्रतिष्ठा टिकवली जाण्यास मदत होईल.

Exit mobile version