पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील वनतारा येथील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी केंद्रातील विविध सुविधांचा आढावा घेत तेथे पुनर्वसन केलेल्या विविध प्राण्यांशी जवळून संवाद साधला. त्यांनी वनतारा वन्यजीव रुग्णालयाची देखील तपासणी केली आणि एमआरआय, सीटी स्कॅन आणि आयसीयूसह सुसज्ज असलेल्या पशुवैद्यकीय सुविधा पाहिल्या. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका हे देखील उद्घाटनाला उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या भेटीचा हृदयस्पर्शी असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ते आशियाई सिंहाचे पिल्लू, पांढरे सिंहाचे पिल्लू, क्लाउडेड बिबट्याचे पिल्लू जे दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजाती आहे, कॅराकल पिल्लू यासह विविध प्रजातींशी खेळताना आणि त्यांना खायला घालताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी खायला घातलेल्या पांढऱ्या सिंहाच्या पिल्लाचा जन्म त्यांच्या आईला वाचवून वनतारा येथे काळजी घेण्यासाठी आणल्यानंतर केंद्रात झाला. भारतात एकेकाळी मुबलक प्रमाणात असलेले कॅराकल आता दुर्मिळ होत चालले आहेत. वनतारा येथे, कॅराकल प्राण्यांना त्यांच्या संवर्धनासाठी बंदिवासात प्रजनन कार्यक्रमांतर्गत प्रजनन केले जाते आणि नंतर जंगलात सोडले जाते.
यावेळी पंतप्रधान मोदींनी रुग्णालयातील एमआरआय रूमला भेट दिली आणि एका आशियाई सिंहाचे एमआरआय करताना पाहिले. महामार्गावर कारने धडकल्यानंतर एका बिबट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि बचावानंतर येथे आणण्यात आले होते अशा ऑपरेशन थिएटरलाही त्यांनी भेट दिली.
हे ही वाचा..
अबू आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवा, अधिवेशनातून निलंबित करा
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण
पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं
छत्तीसगड: प्रार्थना सभांच्या नावाखाली आदिवासींचे धर्मांतर
विशेष म्हणजे केंद्रातील बचावलेले प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे प्रतिबिंब असलेल्या ठिकाणी ठेवले जातात. केंद्रात हाती घेतलेल्या काही प्रमुख संवर्धन उपक्रमांमध्ये आशियाई सिंह, हिम बिबट्या, एक शिंगे असलेला गेंडा आदी प्राण्यांचा इत्यादींचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी हत्ती रुग्णालयाचे काम देखील पाहिले, जे जगातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्रातील विविध सुविधांचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. वन्यजीवांवरील प्रेमाचे प्रदर्शन करत पंतप्रधान मोदींनी सोमवारी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी केली. पंतप्रधानांनी जागतिक वन्यजीव दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, “जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, आपल्या ग्रहाच्या अविश्वसनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करूया. प्रत्येक प्रजाती महत्त्वाची भूमिका बजावते येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे भविष्य सुरक्षित करूया! वन्यजीवांचे जतन आणि संरक्षण करण्यात भारताच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे.”