‘कतार न्यायालयाने आधी मृत्युदंड आणि नंतर तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांना भारतात परत आणण्याचे आश्वासन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिले होते आणि नरेंद्र मोदी सरकारने ते वचन पाळले,’ अशी प्रतिक्रिया माजी भारतीय नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीने व्यक्त केली.
भारताने राजनैतिक मुद्द्यावर ऐतिहासिक विजय मिळवण्याची कामगिरी केली आहे. कतार सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात यश मिळवले. कतारी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर सुमारे साडेतीन महिन्यांनी त्यापैकी सात जण सोमवारी मायदेशी परतले. त्यांची मृत्युदंडाची शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली होती.
हे ही वाचा:
दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या जमिनीवर ‘आप’चे पक्ष कार्यालय!
गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या श्रेणीतून इंदिरा गांधी, नर्गिस दत्त यांची नावे वगळली
मॉरिस युट्युबवरून घेत होता बंदूक हाताळण्याचे प्रशिक्षण
कॅप्टन सौरभ वशिष्ठ यांची पत्नी मानसा वशिष्ठ यांनी त्यांच्या पतीसह इतर सात जणांना कतारी न्यायालयाने ठोठावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचा दिवस आठवला. ‘त्या वेळेचे वर्णन करणे माझ्यासाठी कठीण आहे. त्यावेळी खूप अनिश्चितता होती. मी पूर्ण वेळ दोहामध्ये राहिले होते. त्या वेळी त्यांना फार कमी वेळ भेटण्याची मला परवानगी मिळाली,’ असे त्या म्हणाल्या.
‘जेव्हा आम्ही परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांना भेटलो, तेव्हा त्यांनी त्या सर्वांना परत आणण्याचे आश्वासन दिले आणि त्यांनी (सरकारने) त्यांचे वचन पाळले. माझ्या पतीला परत आणल्याबद्दल मी सरकारचे आभार मानू इच्छिते,’ असे त्या म्हणाल्या.
कॅप्टन सौरभ वशिष्ठ यांनी ‘अशा अशक्य पराक्रमा’चे श्रेय भारत सरकारला दिले. ‘कतार सरकारमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे हा दिवस आला आहे आणि आज मी येथे माझ्या कुटुंबासह डेहराडूनमध्ये उभा आहे,’ असे वशिष्ठ म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रकरणातील सर्व घडामोडींवर सतत देखरेख ठेवली होती, असे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले.हे सात भारतीय नागरिक सोमवारी पहाटे २.३५च्या सुमारास एका खासगी विमान कंपनीने दिल्लीला पोहोचले. आठवा भारतीय नागरिक लवकरात लवकर परत यावा, यासाठी केंद्र सरकार कतारच्या सरकारसोबत चर्चा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.