दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. या याचिकेत त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ही आत्महत्या नसून सामुहिक बलात्कार करून केलेली हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, हे प्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत का आणण्यात आले, राजकीय आरोप आहेत का? असे अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. यावर सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी सविस्तर भाष्य करत उत्तर दिले आहे.
निलेश ओझा म्हणाले की, “आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांविरोधात गँगरेप, हत्या, ३७६ डी, ३०२, १२० अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. त्यांची कस्टडी घेण्यात यावी आणि लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात याव्यात. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं ही याचिकेतून प्रमुख मागणी करण्यात आली आहे,” असं वकील निलेश ओझा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलिस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही करण्यात आल्याचे ते म्हणाले. अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाची माहिती असल्यामुळे त्यांनाही संरक्षण द्यावे, अशी मागणी याचिकेतून केल्याचे ओझा म्हणाले.
“आदित्य ठाकरे, डिनो मौर्या हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे” अशी मागणी वकिल निलेश ओझा यांनी केली.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
“दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केले”
कोस्टल रोड येथे ३० वर्षीय तरुणाची समुद्रात उडी घेऊन आत्महत्या
पाच वर्षांनी ही याचिका का दाखल करण्यात आली यावर बोलताना निलेश ओझा म्हणाले की, आरोपीच्या दलाल लोकांनी हा प्रश्न पेरुन ठेवलेला आहे. अडीच वर्ष गुंडांचे राज्य होते. दुसऱ्याच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करायची, आवाज उठवणार त्यांना मारहाण करायची, महिलांना हरामखोर बोलायचं, कोणाचे घर तोडायचे, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकायचं, अशी सर्व कामं सुरू होती. सतीश सालियन यांच्या घरी जाऊन किशोरी पेडणेकर यांनी दबाव आणला. पोलिस जाऊन त्यांच्याकडे त्यांना सिनेमाची स्क्रिप्ट देतात. या प्रकरणात असं झालं होतं, हे झालं होतं, तुम्ही कोणाला काही बोलू नका. हे सगळं झाल्यानंतर सांगितलं, केस क्लोज झाली. परंतु, जेव्हा यांचे सरकार गेलं आणि शिंदे सरकार आलं तेव्हा सप्टेंबर २०२३ मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आणि शिंदे सरकारमध्ये एसआयटीची घोषणा झाली, अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली. १२ जानेवारी २०२३ रोजी आरोपी म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव असलेली लेखी तक्रार एसआयटीला देण्यात आली. त्यावर एसआयटीने पत्र दिले की, या तक्रारीचा समावेश तपासात करण्यात आला आहे. तरीही तरतूद असताना या प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाही, अशी माहिती सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली आहे.