बदलापूर येथे जी दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराची घटना घडली, त्यामुळे अवघा महाराष्ट्रच नाही तर देशातही संतापाची लाट आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मग तो सत्ताधारी असो की विरोधी पक्षातील व्यक्ती. त्यातूनच बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी उत्स्फूर्त आंदोलनही झाले. त्याचा ताबा नंतर काही समाजकंटकांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण चीड लोकांच्या मनात आहे.
सरकारने त्यानंतर एसआयटीची स्थापना, पोलिसांचे निलंबन, त्या शाळेच्या व्यवस्थापनाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवणे ही पावले उचलली. त्यानंतरही विविध ठिकाणी आंदोलने झाली. निषेध, मोर्चे काढण्यात आले. तेही ठीक आहे. असे प्रयत्नही विरोधकांकडून होणारच. मात्र या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा २४ ऑगस्टसाठी केली होती. पण ही घोषणा केवळ आणि केवळ राजकारणासाठी होती. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हा विकृती आणि संस्कृती यांच्यातील संघर्ष असल्याचे उदाहरण दिले. जे या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देतील ते संस्कृतीचे रक्षक आहेत तर जे या बंदला विरोध करतील ते विकृत आहेत, ते बलात्काऱ्याला पाठिंबा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, जर महाराष्ट्र सरकारने या बंदला रोखण्याचा आणि त्याचा फज्जा उडविण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र दोन महिन्यांनी त्यांचाही फज्जा उडवेल. तेव्हा व्यापारी, सर्वासामान्य नागरिकांनीही या बंदमध्ये सामील व्हावे. कारण हा बंद तुमच्या मुलीबाळींसाठी आहे. जे व्यापारी सहभागी होणार नाहीत त्यांना आपल्या मुलीबाळींची चिंता नाही का?
मुळात ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेण्यामागचे कारण लक्षात आले नाही. हा जर महाविकास आघाडीचा बंद होता तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेत सगळ्यांनी या महाराष्ट्र बंदचे समर्थन करायला हवे होते. पण या बंदची गरज जणू काही फक्त ठाकरेंनाच आहे असे चित्र दिसत होते.
हा बंद करून आपण मुलीबाळींची चिंता करणारे एकमेव नेता आहोत, हे दाखविण्याचा ठाकरेंचा प्रयत्न होता. त्यावेळी वाटले की, बलात्काराचे हे राजकारण करण्याची वेळ का आली असावी? २० ऑगस्टला बदलापूरमध्ये आंदोलन झाले, त्यानंतरही ठिकठिकाणी आंदोलने झाली तरीही महाराष्ट्र बंद करून नेमके ठाकरे किंवा महाविकास आघाडीला काय साध्य करायचे होते? तेव्हा लक्षात येते की, असा बंद करून महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत आपली प्रतिष्ठा वाढविण्याच्या व्यतिरिक्त कोणताही उद्देश नव्हता. ज्या पीडित मुली आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना या महाराष्ट्र बंदमधून कोणता दिलासा मिळणार होता? पण त्यांच्या सुखदुःखाशी कोणतेही देणेघेणे या बंदच्या आयोजनात नव्हते. केवळ होता तो राजकीय स्वार्थ.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा राजकीय पक्षांना अधिकार नाही, न्यायालयाने मविआला फटकारले
रशियाच्या तुरुंगावर ISIS च्या दहशतवाद्यांचा ताबा !
मनू भाकरला ‘पॅरिस’स्पर्श; पुरस्कार, बक्षिसांमुळे संपत्तीत भरभक्कम वाढ!
अनिल अंबानींवर सेबीची कारवाई; पाच वर्षांसाठी बंदी, ठोठावला २५ कोटींचा दंड
तो असण्यामागे काही कारणे लक्षात येतात, ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत लागलेली दिसते. अर्थात, या शर्यतीत उद्धव ठाकरे हेच आघाडीवर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या सभांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असे आवाहन केले. अगदी बंद दाराआडही याची चर्चा करा पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असे त्यांचे म्हणणे होते. पण काँग्रेस असो की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही हा चेहरा जाहीर केलेला नाही. किंबहुना, उद्धव ठाकरे यांचाच चेहरा महाविकास आघाडीपुढे आहे, असे ठाकरे यांना सुचवायचे होते. पण उरलेले दोन पक्ष ते मान्य करायला तयार नाहीत.
आगामी विधानसभा निवडणुकीत सरकार आले तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ते तयारच नाहीत हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी तर शुक्रवारी हे स्पष्ट केले की, आमच्या पक्षातर्फे कुणीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. अगदी मीदेखील या स्पर्धेत आता नाही. हे शरद पवारांनी सांगून एकप्रकारे उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पण उद्धव ठाकरे हे अगतिक झालेले दिसतात. त्यांना काहीही करून मुख्यमंत्री व्हायचे असल्यामुळे ते आता बंदच्या माध्यमातून ठाकरे गटाची ताकद काय आहे, बंदची घोषणा केल्यावर अवघा महाराष्ट्र कसा बंदमध्ये सहभागी होतो, हे दाखवायचे होते. त्यासाठीच त्यांनी पत्रकार परिषद घेत आपला इरादा स्पष्ट केला. पण त्याचवेळी संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाने असा कोणताही बंद राजकीय पक्षांना करता येणार नाही, तसा बंद करणे हे बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट केले. यातून उद्धव ठाकरेंच्या या स्वप्नांना मोठा सुरूंग लागला असण्याची शक्यता आहे. असे बंद करायचे आणि जनतेच्या मनात आपले स्थान बळकट करून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. बलात्काराच्या माध्यमातून राजकारण करण्याची वेळ का आली असा प्रश्न मनात त्यामुळेच येतो.