भेदरलेला नेता जास्त आक्रमक होतो काय?

नकली शिवसेना, सोनियांना घाबरून राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला टाळणारे ठाकरे ही टीका ठाकरेंच्या वर्मी लागली

भेदरलेला नेता जास्त आक्रमक होतो काय?

उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या थयथयाट गेल्या काही दिवसात त्यांचा थयथयाट प्रचंड वाढला असून त्यांच्या तोंडून निघणारे अपशब्द अनेक पटीने वाढलेले दिसतायत. लखनौमध्ये २०० एकर जमीनीवर ईडीने केलेल्या कारवाईचा या थयथयाटाशी काही संबंध आहे का, याचा शोध जाणकार घेतायत.

महाराष्ट्र दिनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज हुतात्मा चौकात पोहोचले. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले. लुटारुंना महाराष्ट्र लुटायला देणार नाही, असे विधान त्यांनी केले. त्यांचा रोख अर्थातच दिल्लीच्या दिशेने होता. ठाकरेंचा जनतेच्या विस्मरण शक्तीवर मोठा विश्वास दिसतो. कारण मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा आणि गुजरात-महाराष्ट्र असे द्वीभाषिक राज्य करण्याचा चंग ज्या काँग्रेसने बांधला होता. ज्या काँग्रेसच्या मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्र्याने म्हणजे मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणाऱ्या १०७ हुतात्म्यांना गोळ्या घालून ठार केले, त्या काँग्रेसच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे भाजपावर शरसंधान करतायत.

आक्रमकपणा वाढण्याची कारणे अनेक असतात. कोनाड्यात अडकलेल्या मांजराला सुटकेचा अन्य मार्ग उपलब्ध नसेल तर तेही फिस्कारून अंगावर येते. वाघ म्हटले तरी मारणार आणि वाघ्या म्हटले तरी मारणार, अशा परिस्थितीत आक्रमक होण्यावाचून पर्याय नसतो. ठाकरेंचे तसे काही झाले आहे काय हे कळायला मार्ग नाही. ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांचे राजकीय भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुटून पडले आहेत. त्यांना मोदींमध्ये औरंगजेब दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून होते. त्यांनी सहा सभा घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.

मोदींच्या भाषणात केंद्र सरकारने केलेल्या कामांची जंत्री असते. उपहासाचे शस्त्र ते इतक्या खुबीने वापरतात की फार ताकद न लावता, ते समोरच्याला रक्तबंबाळ करून टाकतात. नकली शिवसेना, सोनियांच्या धाकाला घाबरून राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला टाळणारे ठाकरे ही टीका उद्धव ठाकरेंच्या वर्मी लागली आहे.

निवडणूक कोणतीही असो ती पूर्ण ताकद लावून लढायची असा, भाजपा नेत्यांचा बाणा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र पुन्हा एकदा दिसते आहे. भाजपा नेते आक्रमक झाले आहेत, म्हणून उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत, की यामागे आणखी काही कारणे आहेत? पडद्याच्या मागे काही घडामोडी सुरू आहेत का? लखनौच्या २०० एकर जमिनीवर ईडीने कारवाई केली. त्याचा ठाकरेंच्या आगखाऊ वक्तव्यांशी काही संबंध आहे का?

या प्रकरणात नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरचा हात असल्याचे उघड झाले. या प्रकरणाच्या निमित्ताने ठाकरेंचा मेहुणा श्रीधर पाटणकर यांचीही चर्चा झाली. ८०० कोटीच्या या विकास प्रकल्पासाठी मुंबईतून पैसा पुरवण्यात आला हेही उघड झाले. याप्रकरणी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मला लंडन ते लखनौ सगळीच माहिती आहे. कोणाची किती प्रॉपर्टी आहे, सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. योग्य वेळी मी माहिती उघड करेन. मुख्यमंत्र्यांचे हे विधान लखनौची जमीन ज्याची आहे, त्याचा रक्तदाब वाढवणारे आहे. मुख्यमंत्र्यांनी लखनौचा उल्लेख केला, लंडनच्या विश्रांतीचाही उल्लेख केला. मी जर बोललो तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांना तोंड लपवून राहण्याची आणि देशातून पळ काढण्याची वेळ येईल, असे मुख्यमंत्री अनेकदा म्हणाले आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे हे स्पष्ट आहे.

लखनौ प्रकरणाशी अद्यापि कोणत्याही राजकारण्याचा थेट संबंध उघड झालेला नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांकडून करण्यात येणार दावे सूचक आहेत. त्यामुळे २०२४ चे निकाल जर भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे लागले तर राजकारण सोडण्याची वेळ येईल याची कल्पना ठाकरेंना आहे.

हे ही वाचा:

सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली!

कोव्हीशिल्ड लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची चर्चा, पण तथ्य नाही

तामिळनाडूतील करियापट्टी येथील दगडखाणीत स्फोट!

नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभेच्या रिंगणात

याच नैराश्यातून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करण्यात येत आहेत. पंतप्रधानांकडून करण्यात आलेल्या टीकेला शेलक्या भाषेत उत्तर दिले जात आहे. मोदींनी लस फुकट दिली, पण लसूण ४०० पार झाला त्याचे काय? अशी असंबध्द बडबड ठाकरेंकडून केली जाते आहे. हिंदुत्व खुंटीला टांगून मोदी राम राम करत फिरतायत, अशी विधाने केली जातायत. पंतप्रधान सहायता निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतायत.

ठाकरे एण्ड सन्सची बडबड इतक्या खालच्या पातळीची आहे की उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना त्याची दखल घ्यावी लागली. मीही नागपूरचा आहे. खालच्या पातळीत मीही बोलू शकतो, असा दम त्यांना भरावा लागावा, अशी परिस्थिती आहे. राज्य सरकारमध्ये बसलेले दोन नेते ठाकरेंच्या विरोधात एका सुरात बोलतायत. त्यामुळे ठाकरे बिथरलेले आहेत. त्यातूनच त्यांचा थयथयाट सुरू आहे. ४ जूनचा दिवस जसजसा जवळ येईल तसा हा थयथयाट वाढणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version