मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी नाकारली की ऑफरच नव्हती?

लोकांनी आता सहानुभूती वगैरेचा विचार न करता मतपेटीद्वारे उत्तर द्यायला हवे.

मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी नाकारली की ऑफरच नव्हती?

विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. कधीही या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या काळात प्रत्येक पक्षात नवे लोक येत आहेत, काही लोक सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कल्याण डोंबिवलीचे माजी स्थायी समिती प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रवेश केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांची दिशाभूल झाली आहे त्यांनाच आम्ही पक्षात स्थान देत आहोत. पण ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना कधीही पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी दिलेला हा इशारा तसा नवा नाही. याआधीही असे इशारे त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. पण त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला तुमच्या पक्षात येण्याची कोणतीही इच्छा नाही. शिवाय, संजय शिरसाट यांनी असा खळबळजनक दावाही केला की, भाजपाने उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली होती, त्यानुसार अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद द्यायला ते तयार होते. पण आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली होती. त्यामुळे भाजपाशी बोलण्यासाठी एकनाथ शिंदे जाण्यास तयार होते तेव्हा त्यांना जाण्यास सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे मात्र काँग्रेससोबत जाण्याचा निश्चय करून मोकळे झाले होते.

संजय शिरसाट यांचा हा दावा नवा आहे. कारण यापूर्वीही याच सगळ्या घटनाक्रमाबद्दल वेगवेगळे दावे प्रतिदावे केले गेले आहेत. बंद दाराआड गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणत होते. पण भाजपाने त्याचा इन्कार केला होता. असे कोणतेही आश्वासन शिवसेनेला देण्यात आले नव्हते असे भाजपाने म्हटले होते. हे असे दावे प्रतिदावे वारंवार होत आले आहेत. २०१९पासून या दाव्यांना आता सुमार राहिलेला नाही. पण त्यामागी सत्य मात्र काही केल्या बाहेर येत नाही.

संजय शिरसाट यांनी जो दावा केला आहे, त्याच्या मुळापर्यंत गेले तर शिरसाट म्हणतात की, मातोश्रीवर आम्ही सगळे आमदार एकत्र आलो होतो. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरले होते. पण भाजपाची ऑफर धुडकावण्यात आली होती. भाजपाने जर खरोखरच अशी ऑफर दिली असेल तर मग उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याची घाई का केली? त्यांना भाजपाने दिलेले हे आश्वासन पूर्ण करून घेण्याची संधी होती. पण एकीकडे आपल्याला बंद दाराआड ऑफर होती, असे उद्धव म्हणतात पण ती ऑफर स्वीकारल्याचे कुठे दिसत नाही. उलट भाजपाने दिलेले वचन पाळले नाही, पाठीत खंजीर खुपसला असे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येते. बरे तशी ऑफरच नसेल तर मग उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत संसार थाटण्याचे कारण काय होते, हेही विचारावे लागेल.

भाजपाने पाठीत खंजीर खुपसला असेल तर तो कसा याचे उत्तर मात्र मिळत नाही. भाजपाने जर बंद दाराआड वचन दिले आणि ते पाळले नाही तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवे होते. ते मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिलेले वचन मोडले त्यामुळे उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे म्हणणे सयुक्तिक ठरले असते. पण भाजपाने वचन मोडून फडणवीस यांना मुख्यमंत्री केले नाही किंवा ते अडीच वर्षे सत्तेतही नव्हते. एकीकडे भाजपाने पाठीत खंजीर खुपसला म्हणायचे पण ते कसे, हे सांगायचे नाही, असा दुहेरी डाव उद्धव ठाकरे खेळतात.

हे ही वाचा:

प. बंगालमध्ये कोळसा खाणीत स्फोट; सहा जणांचा मृत्यू

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये रेल्वे रुळावर ‘मातीचा ढीग’

सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनमधून करणार मतदान

भाजपाने अजित पवार यांच्यासह पहाटेचा शपथविधी घेतला आणि सरकार स्थापनेचा दावाही केला. पण त्यावेळी उद्धव यांच्याकडून भाजपाला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही हे लक्षात घेऊनच हे पाऊल भाजपाने उचलले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला हे स्पष्ट होते.

आता या सगळ्या घटनाक्रमामागील खरे कारण समोर यायला हवे. कारण जनतेला रोज तेच तेच दावे प्रतिदावे यांचा आता कंटाळा आला आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली, अजित पवार यांनी आपल्या काकांना निराश केले वगैरे दावे हे नंतरचे आहेत. खऱ्या घडामोडी या २०१९ला घडलेल्या आहेत. जनतेने भाजपा शिवसेना युतीला बहुमत दिल्यानंतरही उद्धव यांनी विश्वासघाताची थिअरी सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला होता. पण ते लोकांना पटण्यासारखे नाही. मुख्यमंत्रीपद हवे पण ते भाजपासोबतच जाऊन हवे असा हट्ट उद्धव धरू शकले असते पण तसेही त्यांनी केलेले नाही. त्यावरून आता लोकांनीच याबाबतचा तर्क बांधायला हवा. आगामी निवडणुकीत लोकांनी या सगळ्या चिघळलेल्या राजकारणाला जबाबदार कोण याचा एकदा विचार केला पाहिजे. केवळ एकनाथ शिंदे गद्दार, आमचे पक्ष फोडले, आमचे चिन्ह चोरले या दाव्यांना लोकांनी भुलता कामा नये. कारण या सगळ्या घडामोडी या २०२२, २०२३च्या आहेत. २०१९ हे वर्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राजकारण बिघडविण्यास कारणीभूत ठरलेले आहे. लोकांनी आता सहानुभूती वगैरेचा विचार न करता खरोखरच या घाणेरड्या राजकारणाला कोण जबाबदार हे ठरवून मतपेटीद्वारे उत्तर द्यायला हवे.

 

Exit mobile version