अंधेरीतील पी अ्रॅण्ड टी सोसायटीमध्ये महापालिकेला काही झाडे तोडण्यासाठी सांगण्यात आले होते. तौक्तेच्या नुकसानीनंतर या सोसायटीमध्ये काही वृक्ष उन्मळून पडले होते. ते वृक्ष उचलण्याचे काम सुरू असतानाच, पालिकेकडून चांगल्या झाडांवरही कुऱ्हाड चालविण्यात आली. धडधाकट झाडे कापण्याचा प्रयत्न गतवर्षी झाल्याचा इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी न कापता आलेली झाडे यंदा कापण्यासाठी पालिका पुढाकार घेताना दिसत आहे. परंतु रहिवाश्यांच्या मते ही झाडे धोकादायक नसतानाही का कापली जात आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे.
यासंदर्भात बोलताना स्थानिकांचा पालिकेच्या या कृत्याविषयी नाराजीचा सूर दिसून आला. पालिका उन्मळून पडलेली झाडे उचलण्यासाठी काही लाखांचा खर्च सोसायटीला लावते. मग ते काम करता करता पालिका चांगली झाडे तोडत असल्याचे आता समोर आले आहे. या सोसायटीमध्ये गतवर्षी आंब्याचे एक झाड धोकादायक ठरवून पालिकेने कापले होते असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. पालिकेने या सोसायटीतील कामासाठी म्हणजेच वादळामध्ये झालेली वृक्षहानी काम करण्यासाठी १ लाख ८५ हजार घेतले. परंतु पालिका हे काम करत असताना, वसाहतीमधील चांगल्या झाडांच्या मुळावर पालिका घाला घालत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.
हे ही वाचा:
नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु
बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी
ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय
महापालिकेने घेतला घोटाळ्याचा ‘आश्रय’
पालिकेने या सोसायटीमध्ये कोणती झाडे धोकादायक आहेत यावर पंचनामा केला होता. परंतु पंचनामा करताना कोणताही रहिवाशी यावेळी उपस्थित नसल्यामुळे स्थानिकांना आता पालिकेच्या पंचनाम्याविषयीच संशय येत आहे. ही झाडे तोडण्याची आणि कापण्याची एकूणच सर्व प्रक्रिया संशयास्पद असल्याचे इथले स्थानिक अभिजित अवसरमल म्हणतात. अधिक बोलताना ते म्हणाले, झाडे तोडली जात असताना पालिकेचा कर्मचारी किंवा कंत्राटदाराचा कर्मचारी कुणीही उपस्थित नव्हता. त्यामुळे एकूणच पालिकेच्या कारभारावर शंका येत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.