टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?

टोमॅटोचे दर १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत

टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?

देशातील काही भागांत टोमॅटोचे दर १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर, घाऊक बाजारात टोमॅटो ६० ते ८० रुपये किलो दरम्यान मिळत आहेत. विक्रेत्यांनी हवामान आणि पावसाला यासाठी जबाबदार धरले आहे. तर, तज्ज्ञ मात्र पुरेसा साठा न केल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगत आहेत. केंद्र सरकारने मात्र या किमती लवकरच खाली उतरतील, अशी ग्वाही दिली दिली आहे.

देशभरातील बाजारात एका आठवड्यातच टोमॅटोच्या किमती दुपटीने किंवा त्याहून वाढल्या आहेत. गाझियाबादच्या घाऊक बाजारातून टोमॅटोची खरेदी करून किरकोळ विक्री करणाऱ्या सचिनच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात टोमॅटो ३० ते ४० रुपये दराने विकला जात होता, तो आता ७० ते ९० रुपयांदरम्यान तर कुठे तब्बल १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात टोमॅटोच्या किमतीत २०० टक्के वाढ झाली होती. तिसऱ्या आठवड्यात ४० रुपये किलो असणारे टोमॅटो या आठवड्यात १२५ रुपये किलोने विकले जात आहेत. विक्रेत्यांनी उत्तर भारतातील विविध भागांत झालेल्या जोरदार पावसाला जबाबदार धरले आहे. पावसामुळे पिकाचे विशेषत: टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे टोमॅटोचे दर वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा होऊ न शकल्याने भाववाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, बिपर्जय वादळामुळे झालेल्या पावसात महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाले असताना बिहार आणि प. बंगालमध्ये उष्म्यामुळे टोमॅटोचे नुकसान झाले. त्यामुळे भाजी मंडयांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आणि टोमॅटोचे दर वाढले. या परिस्थितीमुळे अन्य भाज्यांचेही दर वाढले आहेत. मात्र काही राज्यांत पुढील एक ते दोन महिन्यांत टोमॅटो किंवा अन्य भाज्यांचे नवे पीक बाजारात येईल आणि किमती खाली उतरतील, अशी आशा व्यक्त होत आहे.

भारत हा फळांचा जगभरातील सर्वांत मोठा आणि भाज्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. मात्र असे असूनही फळे आणि भाज्यांची उत्पादकता प्रति व्यक्ती अतिशय कमी आहे. कारण पिकांची छाटणी केल्यानंतर होणारे नुकसान सुमारे २५ ते ३० टक्के आहे. तसेच, पिकांची गुणवत्ता ही ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत खराब होत जाते. कमी तापमान असल्यास पिके खराब होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कोल्ड स्टोरेजचे महत्त्व अधिक असते.

हे ही वाचा:

‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!

गुरुदक्षिणा देण्याच्या मूडमध्ये मोदी

भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

मुंबईला पावसाने झोडपले; पाणी तुंबण्याच्या घटना, झाड पडून २ मृत्यू

भारतातील कोल्ड स्टोरेजची स्थिती

देशात दरवर्षी फळे आणि भाज्यांचे अंदाजे १३० कोटी उत्पादन होते. एकूण कृषी उत्पादनांपैकी हे प्रमाण १८ टक्के आहे. देशातील हे उत्पादन वाढत असले तरी कोल्ड स्टोरेजच्या कमी क्षमतेमुळे उत्पादनसाठ्यात अडचणी येत आहेत. टोमॅटोच्या कोल्ड स्टोरेजच्या समस्येमुळेदेखील त्याचे दर वाढल्याचे बोलले जात आहे. कृषीतज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘ही परिस्थिती दरवर्षीच उद्भवत असते. या वेळी एक हंगाम संपतो, तर दुसरा सुरू होतो. अनेक भागांत टोमॅटोचे नवे पीक येऊ लागते. मात्र टोमॅटोची आवक कमी झाल्याने त्याचे दर वाढतात. हे नेहमीच होत असते. मात्र यंदा किमती जरा जास्तच वाढल्या आहेत,’ अशी कबुली त्यांनी दिली. केंद्र सरकारनेही याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. टोमॅटोचे उत्पादन, प्रक्रिया आणि साठ्यासाठी काही नवीन उपाययोजना करता येतील का, यावर विचार सुरू आहे.

Exit mobile version