ख्यातनाम गायिका आशाताई यांचा ८ सप्टेंबर हा वाढदिवस. यानिमित्ताने इंडियन आयडल फेम गायिका सायली कांबळेने आशाताईंबाबत व्यक्त केलेलं मनोगत. ‘न्यूज डंका’ला तिने दिलेल्या मुलाखतीत तिने आशाताईंबाबतचं तिचं प्रेम व्यक्त केलं होतं.
‘आशाताईंसोबतचा इंडियन आयडलमधला तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मी त्यांची भक्त आहे. देवाच्या जागी आहेत त्या माझ्यासाठी. लहानपणापासून मी त्यांची खूप गाणी ऐकली आहेत. ‘इंडियन आयडल’मध्ये मला सतत वाटत होतं की, आशाताई याव्यात मग मला त्यांना भेटता येईल. माझी प्रतीक्षा ताणली जात होती. शेवटी मला कळलं की, त्या येत आहेत. मला अक्षरशः धक्का बसला. कारण ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण आला होता, सायली सांगत होती.
आदल्या दिवशी आम्ही सगळे एकत्र बसून गाणं म्हणत होतो. ‘सखी गं मुरली मोहन’ हे आशाताईंचं गाणं ऐकत होतो. इतकं कठीण गाणं आहे. हे आशाताईंनी कसं काय गायलं असेल याचं मला सतत आश्चर्य वाटत राहिलं आहे. कसं शक्य आहे हे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं ते गाणं ऐकताना. आणि त्याच आशाताई दुसऱ्या दिवशी येत आहेत हे कळल्यावर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं.
हे ही वाचा:
शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार
शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!
सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार
विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश
सायली म्हणाली की, त्यांच्यासमोर त्यांचीच गाणी म्हणणं अजिबात सोपं नाही. त्यामुळे थोडं दडपण होतं. त्यांनी जीव ओतून एकेक गाणं गायलं आहे. सुराला एवढं चिकटून कसं काय कुणी गाऊ शकतं, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिलं आहे. त्या आल्या तेव्हा मी त्यांना नखशिखांत न्याहाळले. त्यांच्यावर आम्ही फुलांचा वर्षाव करत होतो. त्या स्थानापन्न झाल्यावर मी आणि अरुणिता अगदी त्यांच्या बाजुला बसलो होतो. आम्ही दोघीही त्यांच्याकडे एकटक बघत बसलो होतो. ते केवळ दैवी होतं. मग मी त्यांच्यासमोर गायले तेव्हा मला खूप भरून आलं. त्यांनाही ते आवडलं आणि त्यांनी माझं आवडतं गाणंही गायलं. चांदण्यात फिरताना. माझ्या अंगावर काटा आला. माझं कौतुकही त्यांनी केलं. मला त्यांना भेटायचं आहे. त्यांच्याकडून शिकायचं आहे. त्या जे काही सांगतील ते ऐकण्याची, ते आत्मसात करण्याची खूप इच्छा आहे.