जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात आहेत. बहुप्रतीक्षित ‘झेड-मोर बोगद्या’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१३ जानेवारी) पार पडले, त्यावेळी ओमर यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. ‘दिल की दूरी’ (हृदयाचा फरक) आणि ‘दिल्ली की दूरी’ दूर करण्याचे काम करत असल्याचे मोदींनी मध्यंतरी म्हटले होते. तुमच्या कामातून ते सिद्ध झाले असल्याचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी मोदींना उद्देशून म्हटले. शिवाय, जम्मू काश्मीरमधील निवडणुकात कोणताही गोंधळ न होता ही निवडणूक पार पडली, असे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. पंतप्रधान मोदींची ओमर यांनी केलेली तारीफ ही सध्या चर्चेत आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान मोदींसोबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
सोनमर्गमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ‘झेड-मोर बोगद्या’च्या उद्घाटनावेळी ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या प्रयत्नांची कबुली देत, या उपक्रमाची प्रशंसा केली आणि असे म्हटले की अशा प्रकल्पांमुळे दिल्ली आणि काश्मीरमधील भावनिक अंतर कमी होण्यास मदत होते.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये तुमच्या कार्यक्रमादरम्यान तुम्ही तीन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही दिल की दूरी (हृदयाचा फरक) आणि दिल्ली की दूरी (दिल्लीपासून अंतर) दूर करण्याचे काम करत आहात असे तुम्ही सांगितले होते आणि हे खरे आहे. तुमच्या कामातून ते सिद्ध झाले असल्याचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी म्हटले.
हे ही वाचा :
भारत बांगलादेश संबंध आणखी ताणले!
१० रुपयांसाठी बस कंडक्टरकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण!
आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!
तुम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेला सांगितले होते की, लवकरच निवडणुका होतील आणि लोकांना त्यांच्या मतांद्वारे सरकार निवडण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचा शब्द पाळला आणि चार महिन्यांत निवडणुका झाल्या. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुठेही अनियमितता झाल्याची तक्रार नाही, सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. याचे श्रेय तुम्हाला (पंतप्रधान मोदी), तुमच्या सहकाऱ्यांना आणि भारताच्या निवडणूक आयोगाला जाते, असे मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस यांची युती होती. मात्र, मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची मागील काही दिवसांची वक्तव्ये पाहता. युतीमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. तसेच इंडी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दिल्ली विधानससभा निवडणुकीतही तसाच प्रकार दिसत आहे. अशावेळी ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळण्याची वेळ लक्षवेधी आहे.