Tata IPL 2022 साठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधीच्या बोलींची लॉटरी लागलेली पाहायला मिळाली पण या लिलावात मुंबई इंडियन्स संघ हा चांगला चर्चेचा विषय ठरला.
मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई संघाने आयपीएल चषकावर पाच वेळेला आपले नाव कोरले आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई संघ हा फारसा सक्रिय दिसला नाही. भारताचा युवा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याला संघात घेण्यासाठी मुंबईने जंग जंग पछाडले. त्याच्यासाठी या आयपीएल लिलावातील सगळ्यात जास्त म्हणजेच १५ कोटी २५ लाखांची बोली लावली. पण या व्यतिरिक्त कोणताही मोठा खेळाडू मुंबई संघाने विकत घेतलेला दिसला नाही.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुंबई संघ काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. क्रिकेट विश्वात हा चर्चेचा विषय बनला होता. दुसऱ्या दिवशीही सुरुवातीला मुंबई संघाकडून फारशी कोणावर बोली लागताना दिसली नाही. पण जेव्हा एक्सेलरेटेड लिलाव सुरु झाला तेव्हा मुंबई संघ पूर्ण ताकदीनिशी उतरलेला दिसला. मुंबईने तब्बल आठ कोटी रुपये मोजत इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरला आपल्या संघात सहभागी करून घेतले. तर त्यासोबतच त्यांनी टीम डेव्हिड या सिंगापूरच्या क्रिकेटपटूसाठी तब्बल ८ कोटी २५ लाख रुपये मोजले.
मुंबईच्या या खेळीने सगळेच चकित झाले. पण तो मुंबईसाठी एक चांगला अष्टपैलू खेळाडू पर्याय असू शकतो असे म्हटले जात आहे. टिम डेव्हिड हा सिंगापूरचा होतकरू युवा खेळाडू हा ताच्या मोठ्या फटक्यांसाठी आणि फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बिग बॅश लीग, पाकिस्तान मधील पाकिस्तान सुपर लीग अशा विविध स्पर्धांमध्ये टीम खेळायला असून त्याच्या फटकेबाजीने सर्वांनाच प्रभावी केले आहे. त्यामुळे टीम डेव्हीडसाठी लावलेली ही बोली मुंबई संघाला चांगलीच फायद्याची ठरू शकते असे मत तज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.